‘रायगड प्राधिकरणा’च्या कामावर शिवप्रेमींकडूनच प्रश्नचिन्ह का?

    19-Jun-2026
Total Views |

Questions Over Raigad Authority
 
नुकत्याच संपन्न झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला दुर्गराज रायगडावर शिवप्रेमींना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला. त्यामुळे सरकारतर्फे ६०० कोटींचा निधी दिल्यानंतरही ‘रायगड प्राधिकरणा’च्या एकूणच कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यासंदर्भात नुकतीच सांस्कृतिक कार्यमंत्रालयाची बैठकही पार पडली असून, सचिवांना कृती आराखडा सादर करण्याचे आदेशही सरकारतर्फे देण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने रायगडावरील पायाभूत सोयीसुविधांच्या समस्यांचा आढावा घेणारा आणि तेथील प्रश्नांवरील समाधान शोधण्याची गरज व्यक्त करणारा हा लेख...
 
छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी आणि अठरापगड बाराबलुतेदार अर्थातच, मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या दुर्गराज रायगडाच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने ‘रायगड विकास प्राधिकरणा’ची स्थापना केली. वर्ष २०१६ ‘शिवराज्याभिषेक’ उत्सवामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘रायगड प्राधिकरणा’ची घोषणा केली होती. केंद्रात भाजप सरकारच्या काळात राज्यसभा नामनिर्देशित सदस्य माजी खासदार कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची ‘रायगड प्राधिकरणा’च्या अध्यक्षपदी निवड करून विकास कृती आराखड्यासाठी ६०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद महाराष्ट्र सरकारने केली होती. पण, गेल्या काही वर्षांत ‘रायगड प्राधिकरणा’च्या कामकाजावर शिवप्रेमींकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रायगडावरील निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि तेथील अव्यवस्था पाहता, करोडो रुपये खर्च करूनसुद्धा तेथे काहीच फरक पडलेला दिसत नसून, येथील अवस्था ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे दुर्गराज रायगड विकासासाठीचा निधी कुठे गेला आणि खर्च झालेल्या शासकीय निधीमध्ये भ्रष्टाचार झाला काय? असा प्रश्न ‘शिवराज्याभिषेक’ उत्सवात रायगडावर शिवप्रेमींमध्ये पुन्हा चर्चिला गेला आहे.
 
रायगड : हिंदुस्थानचे प्रेरणास्थान
 
दुर्गराज रायगड आणि तेथील माती हिंदुस्थानची प्रेरणा व अस्मिता असून, दि. ६ जून रोजी इंग्रजी तारखेप्रमाणे झालेल्या रायगडावरील श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यासाठी शिवप्रेमींची प्रचंड उपस्थिती होती आणि ती उपस्थिती चांगली बाब म्हणावी लागेल.छत्रपती शिवरायांवरील श्रद्धेपोटी लाखो शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि पर्यटक रायगडावर येतात आणि तेथील माती आपल्या मस्तकी लावून धन्य होतात. परंतु, तेथे शिवप्रेमींची होत असलेली गैरसोय ‘रायगड प्राधिकरणा’चे अध्यक्ष म्हणून छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे.
 
शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी रायगडावर प्राधिकरणाकडून शिवभक्तांसाठी साध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली नव्हती. गडावरील स्वच्छतागृहे आणि वॉटर फिल्टरची अवस्थाही बिकट. शिवराज्याभिषेक दिनाच्या दुसर्‍या दिवशी तर रायगडावर पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि स्वच्छतागृहांअभावी अनेक ठिकाणी उघड्यावर केलेल्या मानवी विष्टा दिसत होत्या. शिवप्रेमींसाठी व्यवस्था विषय महत्त्वाचा नाही. परंतु, जेव्हा रायगडावर लाखो शिवभक्त येणार हे माहीत असूनही, प्राधिकरणाकडून व्यवस्था का करण्यात आल्या नव्हत्या? रायगडावरील स्वच्छता व इतर व्यापकतेची जबाबदारी प्राधिकरणाची नाही का? रायगड आणि तेथील माती संपूर्ण हिंदुस्थानसाठी प्रेरणास्थान असून, तेथे गैरप्रकार होणे अपेक्षित नाही. त्यामुळे शिवप्रेमींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ‘रायगड विकास प्राधिकरण’ अध्यक्ष म्हणून छत्रपती संभाजीराजे यांनी सदर अव्यवस्थेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
 
‘रायगड विकास प्राधिकरणा’मधून ‘इनोव्हा’ गाड्या खरेदी करू शकता. मग, रायगडावरील दुरवस्था का नीट करू शकत नाही? असा प्रश्नसुद्धा यानिमित्ताने चर्चिला जात आहे. त्यामुळे नेमकी जबाबदारी कोणाची? छत्रपती संभाजीराजे छत्रपती घराण्याचे वंशज असून, त्यांच्याविषयी श्रद्धा आणि आदर आहेच. पण, देशात संविधान आहे, लोकशाही आहे, कायद्याचे राज्य आहे, त्यामुळे शिवप्रेमींकडून व्यक्त झालेल्या चर्चा आणि प्रश्नावर छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त झालेच पाहिजे.

आग लागल्याशिवाय धूर निघत नाही
 
देशातील करोडो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गराज रायगडच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने प्राधिकरणाचा कृती आराखडा तयार केला असून, ‘रायगड प्राधिकरणा’ला गेल्या काही वर्षांत ६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. पण, रायगडावर गेल्यास तेथे पायाभूत सुविधा अजूनही उभ्या राहिलेल्या दिसत नाहीत. पायाभूत सुविधांची दुरवस्था झाल्याचे चित्र कालपरवा ‘शिवराज्याभिषेक दिन उत्सवा’मध्येही दिसून आले. ‘रायगड प्राधिकरण’अंतर्गत तेथे झालेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याची चर्चासुद्धा दबक्या आवाजात शिवप्रेमींमध्ये सुरू झालेली आहे. पुण्यातील काही शिवप्रेमींनी, ‘रायगड बचाव समिती’ने ‘रायगड प्राधिकरण’ बरखास्त करावे, अशी मागणी छत्रपती शिवरायांच्या सैन्यातील सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज लौकिक गोळे आणि अर्चना मारणे यांनी केली. लौकिक गोळे हे छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात कर्तृत्व गाजविणार्‍या पिलाजी गोळे यांचे वंशज असल्याने प्राधिकरण अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांच्यावर केलेल्या आरोपाला विशेष महत्त्व आहे. तसेच छत्रपती संभाजीराजे यांनी ‘रायगड प्राधिकरण’च्या बैठकीमध्ये अध्यक्ष म्हणून स्वतःसाठी इनोव्हा गाडी खरेदी केल्याची चर्चासुद्धा लौकिक गोळे यांनी केली आहे. मराठी भाषेत एक म्हण आहे, ‘आग लागल्याशिवाय धूर निघत नाही.’ म्हणजे, कोणतीही चर्चा किंवा आरोप कुठल्याही कारणाशिवाय निर्माण होत नाहीत. एखाद्या गोष्टीची चर्चा होत असेल, तर त्यामागे काहीतरी निश्चित कारण किंवा तथ्य असण्याची शयता असते. भ्रष्टाचार होत असल्याची शंका व्यक्त करणे, यालाच ‘आग लागल्याशिवाय धूर निघत नाही,’ असे म्हटले जाते.
 
‘रायगड प्राधिकरणा’ची नऊ वर्षांची कारकीर्द
 
हिंदुस्थानची अस्मिता असलेल्या दुर्गराज रायगडाच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने ‘रायगड विकास प्राधिकरण’ची स्थापना २०१६ साली केली आहे. गेल्या नऊ वर्षांत ‘रायगड विकास प्राधिकरणा’साठी ६०० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर असूनही तेथील पाणी, स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन आदी पायाभूत सुविधांची दुरवस्था झाली आहे. तसेच रायगडावरील टकमक टोकाजवळच्या सुरक्षा जाळ्या गंजलेल्या, चुन्याचा घाणा, शिवकालीन दारूची जाळी आदी ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान होत आहे. तसेच विकासाच्या नावाखाली करण्यात आलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून, लौकिक गोळे यांच्या सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये स्पष्ट दिसत आहेत. तसेच तुषार दामुगडे यांनीसुद्धा काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण? पुरातत्त्व विभाग आणि इतर यंत्रणा जबाबदार आहेच. परंतु, ‘रायगड प्राधिकरण’ अध्यक्ष म्हणून छत्रपती संभाजीराजे यांचीसुद्धा महत्त्वाची जबाबदारी असून, शिवप्रेमींनी उपस्थित केलेल्या प्राधिकरणाच्या कामांवरील प्रश्नचिन्हांवर खुली चर्चा करून व्यक्त झाले पाहिजे.
 
- अशोक राणे