पर्यावरणाच्या राखणदार ‘शीतल’


 
 Sheetal Ugale Inspires Change
 
पर्यावरणरक्षणासाठी लोकांना प्रेरित करून त्यांनी शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान द्यावे, यासाठी विविध उपक्रम राबविणार्‍या शीतल उगले यांच्याविषयी...
 
समाजात बदल घडवायचा असेल, तर केवळ समाजमाध्यमांवर ‘पोस्ट’ टाकून किंवा भाषण देऊन चालत नाही, तर प्रत्यक्ष मैदानात उतरूनच काम करावे लागते, असा विचार मांडणार्‍या शीतल उगले यांचे नाशिकमधील कार्य फार मोठे आहे. एक नाशिककर म्हणून या शहराची काळजी घेणे, ही पहिली जबाबदारी असल्याचे त्या मानतात. स्वच्छता मोहिमांमध्ये काम करत असताना, लोकांना पर्यावरणाचा विषय समजतो. पण, त्यांना याच्याशी भावनिकरीत्या जोडणेही गरजेचे आहे. म्हणूनच, ‘रन’ आणि स्वच्छता मोहीमांची सांगड घालण्याची कल्पना त्यांना सुचली.
 
‘रन’मुळे विविध वयोगटांतील लोक एकत्र येतात. त्यामुळे त्यांच्यात संवाद होऊन, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नंतर जेव्हा तेच लोक प्रत्यक्ष कचरा उचलतात, तेव्हा त्यांना समस्येचीही जाणीव होते, असे शीतल सांगतात. त्यांच्यासाठी ‘रन’ हा केवळ ‘फिटनेस’चा कार्यक्रम नसून, नागरिकांमध्ये शहराबद्दल मालकीची भावना निर्माण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. याची सुरुवात काही वर्षांपूर्वी अमेरिकेत असलेल्या मैत्रिणीसोबत, पर्यावरणविषयक चर्चांदरम्यान झाली. या चर्चांमधून पर्यावरणाच्या समस्या जगभरात असून, प्रत्येक देशाची लढाई वेगळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
 
अमेरिकेमध्ये लोक ‘कार्बन फूटप्रिंट’ कमी करण्यावर, शाश्वत जीवनशैलीवर आणि हवामानबदलासारख्या मोठ्या विषयांवर काम करत आहेत. पण, भारतात अजूनही लोकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, हे शिकवावे लागते. ही वस्तुस्थिती वेदनादायक असल्याचेही त्या सांगतात. या चर्चांमधूनच, या समस्येवर प्रत्यक्ष काम करण्याचा निर्णय शीतल यांनी घेतला. त्यांनी परिवार आणि काही सहकार्‍यांसोबत, छोट्या स्वच्छता मोहिमा घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मोजकीच माणसे जोडली गेली. पण, समाज माध्यमांमुळे याचा प्रसार होण्यास मदत झाली. परिणामी, अधिकाधिक नागरिक या मोहिमांशी जोडले गेले.
आज हा उपक्रम केवळ स्वच्छता मोहिमांपुरताच मर्यादित राहिलेला नसून, एक नागरिक चळवळच बनला आहे. विविध वयोगटांतील लोक स्वखुशीने यात सहभागी होत आहेत. लोक आता केवळ समस्याच दाखवत नसून, तर त्याचे समाधान शोधण्यातही सहभागी होत असल्याचे शीतल उत्साहाने सांगतात. गेल्या काही वर्षांत, हजारो नागरिकांनी विविध स्वच्छता मोहिमांमध्ये सहभाग घेताल्यचीही शीतल सांगतात. मात्र, त्यांच्यासाठी हा आकडा महत्त्वाचा नाही. त्याऐवजी एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्ष सहभागी होत समस्येला जवळून पाहिले की, तिचा दृष्टिकोन बदलतो. ती पुन्हा येते आणि इतरांनाही सोबत घेऊन येते, ते महत्त्वाचे आहे असे शीतल सांगतात. तरीही, काही हजारो लोकांनी काम करून नाशिक पूर्णपणे बदलणार नाही. हे शहर खरोखर सुंदर बनवायचे असेल, तर जास्तीत जास्त नाशिककरांनी या चळवळीत सहभागी होणे गरजेचे असल्याचे शीतल यांचे ठाम मत आहे. त्यांचा उद्देश प्रत्येक नागरिकामध्ये ‘हे शहर माझं आहे’ ही भावना जागृत करण्याचा आहे.
 
नाशिक हे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर असल्यामुळे पंचवटी, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, नदीकिनारे, जलाशय आणि विविध पर्यटनस्थळांवर कचर्‍याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. जिथे पर्यटकांची वर्दळ जास्त असते, तिथे कचर्‍याचे प्रमाणही अधिक असते. विशेषतः रंगपंचमी, दिवाळी आणि इतर मोठ्या सणांनंतर, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणातच कचरा
दिसून येतो. शहरातील मोकळ्या जागाही अनेकदा अनधिकृत कचरा डेपो बनतात. ही समस्या केवळ स्वच्छतेचीच नाही, तर नागरिकांच्या जबाबदारीचीही आहे. आपण निसर्गाचा आणि सार्वजनिक जागांचा आनंद घेतो, तर त्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे असे त्या प्रत्येकाला सांगतात.
 
या उपक्रमांमुळेच लोकांच्या वागणुकीत सकारात्मक बदल दिसून येत असून, आज लोक प्लास्टिक वापरण्यापूर्वी विचार करू लागले आहेत. अनेक जण स्वतःची पाण्याची बाटलीच वापरतात आणि सिंगल-यूज प्लास्टिक टाळतात. तसेच, कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करण्याचाही प्रयत्न करतात. स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या अनेक लोकांचा, निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आज बदललेला दिसतो. काहीजण नियमितपणे मोहिमांमध्ये सहभागी होतात, तर काहींनी स्वतःच्या परिसरात छोटे उपक्रमही सुरू केले आहेत. अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्‍यांना, विनम्रपणे समजावून सांगत असल्याचेही शीतल अभिमानाने सांगतात. या कामात सर्वांत मोठे आव्हान म्हणजे, लोकांची उदासीनता आणि यातून काही बदलणार नाही, ही मानसिकता, असल्याचेही शीतल अधोरेखित करतात. शिवाय, टीका आणि नकारात्मक प्रतिक्रियाही शीतल यांना ऐकाव्या लागतात. तरीही, प्रत्येक मोहिमेनंतर काही नवीन लोक जागरूक होतात, काहींच्या सवयी बदलतात आणि काहीजण या कामात सहभागी होत असल्याचे आनंद या सगळ्यापेक्षा जास्त असल्याचे त्या सांगतात. त्यातून प्रेरणा मिळत असल्याचे शीतल यांचे मत आहे. अशा या पर्यावरणरक्षणासाठी प्रत्येकाला साद घालणार्‍या पर्यावरणप्रेमीला, पुढील कामासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!




विराम विलास गांगुर्डे

दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये नाशिक विभागीय कार्यालयात उपसंपादक या पदावर कार्यरत. द्राक्षपंढरी म्हणून प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे जन्म आणि तेथेच बी. कॉम. ही पदवी, तर वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातून प्राप्त. ग्रामीण जीवन आणि अर्थकारण, राजकीय आणि सामाजिक या विषयावरील वृत्तांकनामध्ये विशेष रस.
संबंधित मजकूर