आपल्या नृत्यप्रवासातून भारतीय संस्कृतीचा विचार सातासमुद्रापार पोहोचवणार्या कार्तिकी ठाकुरदास यांचा जीवनप्रवास...
कलाक्षेत्रात कायम बोलले जाणरे वाक्य म्हणजे- 'The Show Must Go On!' अंगात कितीही ताप असला, डोके कितीही जड वाटत असले, तरी कलाकाराचे कर्तव्य म्हणजे रंगमंचावर पाय ठेवताच, या सगळ्या गोष्टींना विसरून आपली कला प्रामाणिकपणे रसिक प्रेक्षकांसमोर सादर करणे. आपले देहभान हरपून रंगपूजा बांधणार्या कलाकारांचा समृद्ध वारसा मराठी मातीला लाभला आहे. संगीत रंगभूमीच्या अवकाशात ज्यांची नाममुद्रा सुवर्णाक्षरांनी कोरली गेली, असे बालगंधर्व असो किंवा लोककलेसाठी जीवन देणार्या विठाबाई नारायणगावकर, आपल्या जीवनाचे सत्त्व या माणसांनी आपल्या कलेमध्ये उतरवले आणि कलेचा इतिहास बदलला. अशाच ‘कथ्थक’ नृत्याची साधना करणार्या एका बहुआयामी युवतीचे नाव म्हणजे कार्तिकी ठाकुरदास.
दादरच्या कार्तिकी ठाकुरदास यांचा जीवनप्रवास अनेक वेगवेगळ्या वळणांनी भरलेला आणि बहरलेला. कार्तिकी यांचे वडील अमोल ठाकुरदास यांनी २५ वर्षे ‘दूरदर्शन’वर काम केले. कार्तिकी यांच्या मातोश्री लहानपणापासून ‘कथ्थक’ चे धडे घेत होत्या. आपल्या जीवनाची २५ वर्षे आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये कार्तिकी यांच्या मातोश्रींनी विद्यार्थ्यांना कलेचे शिक्षण दिले. कुटुंबातूनच प्राप्त झालेल्या कलेच्या वारशामुळे, कलेचा संस्कार उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेला. कार्तिकी यांच्या घरामध्ये लहानपणापासूनच अध्यात्माचे वातावरण होते. त्यांचे आजोबा चंद्रकांत माणिकबुवा ठाकुरदास ऊर्फ परमपूज्य नामचैतन्य भानुदास यांच्या मार्गदर्शनातून अनेकांना भक्तीचा मार्ग गवसला.
शास्त्रीय नृत्य हा लहानपणापासून कार्तिकी यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. अर्थशास्त्रामध्ये पदवीचे शिक्षण घेतानाच, फ्रेंच भाषेमध्येसुद्धा कार्तिकी पारंगत झाल्या. काही काळ ‘बॉम्बे स्टॉक एसचेंज’मध्ये ‘कंटेन्ट रायटर’ म्हणून त्यांनी काम केले. ‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणून आवाजाच्या क्षेत्रातही त्यांचे कार्य सुरू आहे. इतरत्र काही खासगी संस्थांमध्येसुद्धा त्यांनी नोकरी केली. मात्र, त्यांची साधना त्यांना एक नवीन प्रवास करायला लावणार होती. दिवंगत गुरू आशाताई जोगळेकर, गुरुवर्या डॉ. रूपाली देसाई आणि भक्ती भाटवडेकर यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या नृत्यविद्येचा पाया पक्का होत गेला. याव्यतिरिक्त विख्यात गुरू पंडित बिरजू महाराज, गुरू डॉ. मंजिरी देव, तालमणी पंडित मुकुंदराज देव, गुरू शमा भाटे, फुलवा खामकर, यांच्याकडून त्यांनी नृत्याचे धडे गिरवले.
‘कथ्थक’ हा त्यांच्या जीवनाचा खर्या अर्थाने सूर बनला, तो २०१७ सालापासून. गुलजार यांच्या लेखणीतून साकारलेल्या, प्रख्यात दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बोले नैना’ या अनोख्या सादरीकरणामध्ये त्यांनी नृत्य सादर केले. ‘दूरदर्शन’च्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरदेखील त्यांना सादरीकरणाची संधी लाभली. ‘एनसीपीए’च्या कार्यक्रमातदेखील त्यांनी आपला सहभाग नोंदवला. नंतरच्या काळात मुंबईच्या प्रख्यात ‘काळाघोडा आर्ट फेस्टिव्हल’मध्येसुद्धा त्यांनी आपल्या नृत्याची वेगळी छाप उमटवली. खारघर इथल्या ‘इस्कॉन’ मंदिराच्या उद्घाटनप्रसंगीसुद्धा त्यांनी आपल्या नृत्यकौशल्यातून श्रोतृवृंदाला मंत्रमुग्ध केले. ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नृत्य-नाटिकेचादेखील त्या भाग होत्या. २०२५ साली प्रयागराज इथल्या महाकुंभ येथेसुद्धा त्यांनी आपल्या नृत्याचे सादरीकरण केले.
एका बाजूला यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करताना, दुसर्या बाजूला जीवनाने मात्र त्यांच्या समोर काळाच्या ओघात जणू अडचणींचा डोंगरच रचायला सुरुवात केली. प्रत्येक मुलीच्या जीवनात वडील म्हणजे तिची ताकद असते. मात्र, दुर्दैवाने २०२५ साली ऑटोबर महिन्यात त्यांच्या वडिलांची प्राणज्योत मालवली. कार्तिकी यांच्या जीवनाचा एक आधारस्तंभ निखळला. दु:खाचे आभाळ भरून आले. अशा परिस्थितीमध्ये गलितगात्र होत, नैराश्याच्या गर्तेत अडकणे स्वाभाविक असते. मात्र, घरातून मिळालेला कलेचा वारसा, आध्यात्मिक विचार, यामुळे पुन्हा एकदा स्वतःला सावरत त्या कामाला लागल्या.
२०२६च्या सुरुवातीला ‘आयसीसीआर’च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘इंटरनॅशनल वर्क टूर ऑफ कथ्थक’मध्ये त्यांनी आपली नृत्यकला सादर करत भारताचे प्रतिनिधित्व केले. ७७व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कतार या देशात त्यांनी आपली कला सादर केली. इजिप्तमध्ये १३व्या ‘आस्वान आंतरराष्ट्रीय महोत्सवा’त त्यांनी आपला सहभाग नोंदवला व इराकमधल्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये फेब्रुवारी महिन्यात त्यांनी आपल्या संस्कृतीची मोहोर उमटवली.
कार्तिकी यांच्या शिकण्याचा प्रवास या सगळ्यामध्ये कुठेही थांबलेला नाही. एका बाजूला जीवनाची सारी आव्हाने पेलताना, दुसर्या बाजूला मुला-मुलींना शिकवताना त्याची सावलीसुद्धा त्या, त्यांच्यावर पडू देत नाहीत. वास्तविक, हा गुण पालकत्वाचा! मात्र, कार्तिकी यांनी त्यांच्या कलेच्या शिक्षणातूनच हा विचार आत्मसात केला. त्यांच्या समृद्ध वाटचालीसाठी त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!