पालघर (Palghar Tribal Development Service Week) : आदिवासी आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांनी परस्पर समन्वयाने काम करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त पालघर येथे आयोजित ’जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ अंतर्गत मुख्य लाभ वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला, तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या एका वृद्ध महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांचा नुकसान भरपाईचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
पालघर येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी हा भव्य कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून करण्यात आली. या कार्यक्रमाला पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले की, "पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असून या भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. केवळ निधी मंजूर करून चालणार नाही, तर त्याची प्रत्यक्ष आणि पारदर्शक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार निर्मितीला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य राहील." अधिकार्यांनी संवेदनशील राहून जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
या कार्यक्रमात मानव-वन्यजीव संघर्षात बळी पडलेल्या कुटुंबाप्रती शासनाने संवेदनशीलता दाखवली. या महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झालेल्या ७६ वर्षीय महिलेच्या कुटुंबीयांना वन विभागामार्फत २५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली होती. जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या निमित्ताने विविध विभागांच्या स्टॉल्सचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना जातीचे दाखले, शिधापत्रिका, आयुष्मान भारत कार्ड, कृषी अवजारे आणि विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचे मंजुरी पत्र देण्यात आले. खासदार डॉ. हेमंत सवरा यांनीही यावेळी केंद्र आणि राज्य शासनाच्या आदिवासी विकास योजनांची माहिती देत नागरिकांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. (Palghar Tribal Development Service Week)
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.