नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरघोडी आणि सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच आहेत. त्यातच बांगलादेशात सत्तापालटाने अस्थिरता निर्माण झाली आहे. तसेच, पाकिस्तानने सीमेवर नापाक हालचाली सुरू केल्याने तणाव वाढला आहे. भारतीय सैन्याचे प्रमुख सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी याबाबत माहिती दिली. काश्मीरमधील दहशतवादी हल्ले आणि बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
“दुसर्या महायुद्धानंतर सध्या संपूर्ण जग एका मोठ्या घातक स्थितीतून जात आहे,” असे सीडीएस जनरल चौहान यांनी सांगितले. “भारत-पाकिस्तान सीमेवर पीर पंजाल भागात अचानक तणाव वाढला आहे. बांगलादेशात सत्तापालटाची घटना सुरू असताना दुसर्या देशांसोबतचा सीमेवरील तणाव कायम आहे,” असे सीडीएस अनिल चौहान यांनी सांगितले.
शस्त्र आयातीवर अवलंबून राहून चालणार नाही
सीडीएस चौहान यांनी बांगलादेशातील हिंसाचाराचाही उल्लेख केला. “भारत दोन प्रमुख आव्हानांचा सामना करत आहे. यात आपल्या शेजारी देशात निर्माण झालेली अस्थिरता ही चिंतेचे कारण ठरली आहे. भारतासारख्या मोठ्या देशाला सुरक्षेसंबंधी अनेक समस्या आहेत. यामुळे भारताला युद्ध शस्त्रास्त्रांसाठी विदेशातून आयातीवर अवलंबून राहून चालणार नाही. खास करून जागतिक सुरक्षा आणि कायम अस्थिर स्थितीचा सामना सरकार करत आहे,” असे सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट केले.
चीनसोबतचा सीमावाद कायम, पीर पंजालची भर
“दिल्लीत सैन्याशी संबंधित आयोजित एका कार्यक्रमात सीडीएस चौहान बोलत होते. भारतासमोर सुरक्षेची आव्हाने आहेत. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये प्रॉक्सी वॉर म्हणजे छुपे युद्ध छेडलेले असल्याने पूर्वीपासूनच आपण त्याचा सामना करत आहोत. यात आता अचानक पीर पंजाल रेंजची भर पडली आहे,” असे सीडीएस चौहान म्हणाले. तसेच, “चीनशी दीर्घकाळापासून असलेला सीमावाद अजूनही कायम आहे,” असेही सीडीएस चौहान पुढे यांनी सांगितले.