‘सिटी ऑफ लव्ह’ म्हणून जगभरात आपली ओळख निर्माण करणाऱ्या पॅरिसमध्ये प्रेमाचा... एकतेचा संदेश देत ऑलिम्पिकचा सोहळा संपन्न झाला. पॅरिसमधील समारोप सोहळ्यातून बाहेर पडताना हजारो आशा आकांशाना हृदयात सामावून मी निघत होतो. पॅरिसमध्ये एतिहासिक सेन नदीवर एक ब्रिज आहे. लव्ह लॉक ब्रिज असे त्याचे नाव. जगभरातून आलेले प्रेमी या ब्रिजवर आपल्या प्रेमाला स्मरण करून त्या ब्रिजवर टाळं ठोकायचे. आणि त्या टाळ्याची चावी सेन नदीत फेकून द्यायचे. आपली प्रेयसी अथवा ज्यावर तुमचे अतीव प्रेम आहे त्याला स्मरून हे टाळे ठोकले जायचे. असे केल्याने तुमच्या इच्छा पुर्ण होतात अशी येथे भावना आहे.
लक्षात घ्या तब्बल पाच कोटी प्रवासी दरवर्षी जगभरातून पॅरिसमध्ये दाखल होतात. त्यांच्या प्रेमाचे टाळेरुपी ओझे सहन करून या ब्रिजचा काही भाग कोसळला. आणि सरतेशेवटी प्रशासनाने ही प्रेमाची परंपरा खंडीत करत ब्रिजवरून टाळे हटवले. २०१२ साली पत्नीसोबत मी आलो होतो तेव्हा तेथे आम्ही टाळे ठोकले होते. यंदा ऑलिम्पिकच्या निमित्ताने या ब्रिजवर मला ही एक टाळे ठोकायचे होते. भारताच्या ११७ जहांबाज भारतीय ऑलिम्पियन खेळाडूंसाठी. ज्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची आण...बाण... आणि शान ठिकवण्यासाठी आपल्यातील सर्वोत्तम कामगिरी दिली.
आपला देश हा मेडलचा भुकेला आहे... आपल्याला ‘आशया’पेक्षा हिरो लागतात. जोवर हिरो सापडत नाही तोवर पिक्चर फ्लॉप असतो. साधं उदाहरण घ्या. माझं हे सहावे ऑलिम्पिक. अथेन्स ऑलिम्पिकमध्ये भालाफेक हा खेळ आम्हा पत्रकारांच्या खेळ कव्हर करण्याच्या यादीतही नव्हता. नीरज चोप्राने भालाफेकीत गोल्ड मेडल जिंकेपर्यंत या खेळाकडे कुणी फिरकतही नसे वा माध्यमांमध्येही त्याची चर्चा नसे. यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक नंबर एकवर होता. या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये असे उद्याचे अनेक हिरो सापडलेत इतके नक्की. भारताची मेडल संख्या सहा आहे. त्यात निरजचे सिल्व्हर आणि पाच ब्राँझ मेडल आहेत.
मनु भाकरचे एकाच ऑलिम्पिकमधिल दोन ब्राँझ मेडल ही स्वप्नवत कामगिरी. या मेडल विजेत्या खेळाडूंचे कौतुक झालेच. पण असे ९ खेळाडू आहेत जे मेडलला अक्षरशा स्पर्श करून आले. त्यातील ७ खेळाडूंना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. एकाने फायनलला धडक दिली तर महिला कुस्तीपटू विनेश फोगटचे फायनल पोहचूनही हक्काचे मेडल वजन जास्त झाल्यामुळे हातचे गेले. थोडक्यात चौथ्या क्रमांकावर खेळाडू पोहचण्याची भारतीय ऑलिम्पिकच्या इतिहासातील ही आजवरची विक्रमी संख्या आहे.
या ९ मेडलला जर आपण गवसणी घालू शकलो असतो तर मेडलची संख्या यंदा १५ झाली असती जी टोकीयो ऑलिम्पिकच्या ७ मेडलच्या तुलनेत डबल होती. या चौथ्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूत शुटींगमध्ये मनू भाकर, अर्जुन बभुता, स्कीट मिश्र दुहेरी शुटींगमध्ये अनंत जीत आणि महेश्वरी, तिरंदाजी मिश्र दुहेरीत धीरज बोम्मदेव आणि अंकिता, बॅडमिंटनमध्ये लक्ष्यसेन, वेटलिफ्टींगमध्ये मीराबाई चानू आणि अथलेटिक्समध्ये ३००० मीटर स्टीपलचेसची फायनल गाठणारा महाराष्ट्राचा अविनाश साबळे.
३००० मीटर स्टिपल चेसची फायनल गाठणारा अविनाश हा भारताचा पहिला खेळाडू ठरलाय. आणि सर्वात शेवटी विनेश फोगटचे हातचे गेलेले मेडेल. या सर्व जिगरबाज खेळाडूंसाठी कौतुकाची एक टाळी तर बनतेच. या सगळ्यांसाठी त्या ब्रिजवर एक टाळे ठोकायचे होते. पण आता तो ब्रिजही तेथे नाही. सेननदीवरून जाताना त्या मावळत्या सुर्याची किरणं मला जणू सांगत होती...उद्याचा तेजोमय सुर्य नक्की तुमचा असेल... अलविदा पॅरिस... या सुंदर आठवणींच्या ठेवीसाठी!
संदीप चव्हाण