ठाणे : पावसाने उसंत घेतल्याने ठाणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम वेगाने सुरू आहे. ठाणे मलपालिकेच्या त्रिसुत्री नुसार खड्डे बुजवण्याचे काम सुरु असुन मास्टिक पद्धतीने खड्डे भरले जात आहेत.मात्र, सर्व प्राधिकरणाच्या सोबतीने खड्डे भरण्यासाठी वाहतुक पोलीसही रस्त्यावर उतरले असल्याचे दिसत आहे. ठाण्यातील घोडबंदर रस्ता हा राज्य महामार्ग असून सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, मेट्रो प्रकल्प तसेच ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या रस्त्याची देखभाल केली जाते.
या मार्गावरील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यांवरून चौफेर टीका होऊ लागताच मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्डे भरणीची कामे हाती घेतली. खड्डे भरणीसाठी जागोजागी रस्त्याच्या कडेला रेती आणि दगडांचे ढीगही लावण्यात आले आहेत. यावेळी ज्या भागात खड्डे आहेत त्या हद्दीत कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांनीही हातात फावडे घेऊन खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे. कॅडबरी सिग्नल,माजिवडा, कापूरबावडी, आनंदनगर व कासारवडवली येथे चक्क वाहतुक पोलीस खड्डे भरणी करीत आहेत.
खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकची मागणी वाढली
ठाण्यातील विविध प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी या प्राधिकारणांकडूनही मास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. परिणामी खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकची मागणी वाढली असल्याने खड्डे बुजवण्यासाठी उपयोगी ठरलेल्या मास्टिकसाठी सध्या सर्वच यंत्रणांची धावपळ सुरू आहे.घोडबंदर रोडवर मास्टीकचा वापर अधिक प्रमाणात सुरु आहे. तुलनेने मास्टिकचा पुरवठा करणाऱ्यांची संख्या अल्प असल्याने मास्टिक वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी ठेकेदार करीत आहेत.