श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे दि. ९ जून २०२४ रोजी हिंदू यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, या हल्ल्यात नऊ यात्रेकरू ठार झाले होते आणि अनेक जण जखमी झाले होते. या हल्ल्याच्या तपासादरम्यान स्थानिक व्यापारी हकम दिन (४५) याने दहशतवाद्यांना मदत केल्याचे समोर आले आहे. अवघ्या ५००० रुपयांसाठी हकम दिनने देशाचा विश्वासघात केला.
आता तपास यंत्रणांनी रियासी हल्ल्यात सहभागी आणखी दोन दहशतवाद्यांची रेखाचित्रे तयार केली आहेत, जी हकम दीनची चौकशी केल्यानंतर तयार करण्यात आली आहेत. आता या प्रकरणाचा तपास जम्मू-काश्मीर पोलिसांऐवजी एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. हकम दीन हा राजौरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला पोलिसांनी दि. २० जून रोजी अटक केली होती.
हकीम दीन हा माता वैष्णोदेवी मंदिरात कुली म्हणून काम करत असे, मात्र तीन वर्षांपूर्वी त्याने नोकरी सोडून गुरांचा व्यापार सुरू केला. एनआयएकडे तपास सोपवण्यापूर्वी वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहिता शर्मा यांनी हकमला “दहशतवाद्यांचा प्रमुख सहकारी” मानले होते. त्याच्या अटकेनंतर हकम दिनची तपास यंत्रणांनी चौकशी केली.
दि. ९ जून रोजी कटरा येथील शिव खोरी मंदिर ते माता वैष्णो देवी मंदिराकडे जाणाऱ्या ५३ आसनी बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात नऊ जण ठार आणि ४१ जखमी झाले होते. या गोळीबारामुळे बस रस्त्यापासून दूर जाऊन खोल दरीत पडली होती. रियासी हल्ल्यानंतर खोऱ्यात आणखी दोन दहशतवादी हल्ले झाले, कठुआ दहशतवादी हल्ला आणि डोडा दहशतवादी हल्ला. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रियासी दहशतवादी हल्ला प्रकरणाचा तपास दि. १५ जून रोजी हाती घेतला होता.