मुंबई : पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालल्याने लेप्टोसारखा रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे साचलेल्या पाण्यातून चालणे टाळावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने नागरिकांना केले आहे. गेल्या वर्षी महापालिका क्षेत्रात लेप्टोच्या रुग्णसंख्येत वाढ झाली होती. त्यामुळे यावेळी महापालिकेने पावसाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच सोशल मीडिया पेजवर पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी इत्यादी प्राण्यांच्या लघवीद्वारे लेप्टोचे सुक्ष्मजंतू पावसाच्या पाण्यात संसर्गीत होतात. अशा बाधित झालेल्या पाण्याशी माणसाचा संपर्क आल्यास त्याला लेप्टोची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे जखमा\ खरचटलेला भाग असलेल्या ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आलेला असतो. त्यांना लेप्टोचा धोका असतो. कारण छोट्या जखमीतून सुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संपर्क आला असेल त्यांनी तातडीने वैदकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करावेत.
लेप्टोस्पायरोसिस लक्षणे
ताप येणे, डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्त्राव इत्यादी या रोगाची लक्षणे आहेत. रुग्णांना श्वासोच्छश्वासास त्रास होणे, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, अशीही लक्षणे आढळतात. योग्य औषधोपचाराअभावी व्यक्तीचा मृत्यू होण्याचा ही धोका संभवतो.
लेप्टोस्पायरोसिस बाबत माहिती
- ज्या व्यक्ती फक्त एकदा साचलेल्या पाण्यातून चालल्या आहेत. त्या 'कमी जोखीम' गटात मोडतात.
- जखमा असलेल्या किंवा चूकून पुराचे साचलेले पाणी तोंडात गेलेल्या व्यक्ती 'मध्यम जोखीम' गटात मोडतात.
- जास्तवेळ पुराच्या किंवा साचलेल्या पाण्यात चालल्यास त्या व्यक्ती 'अतिजोखीम' गटात मोडतात.
- मनुष्यापासून मनुष्याला लेप्टोच्या संसर्गाची बाधा होत नाही.
- उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी , बैल तसेच इतर प्राणी या रोगाचे स्त्रोत आहेत.
- संसर्गित जनावरांच्या मुत्राद्वारे दूषित झालेले पाणी किंवा माती यामार्फत मनुष्याला संसर्ग होतो.
रोगाबाबत घ्यावयाची काळजी
-पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा टाळणे किंवा गमबुटाचा वापर करणे.
- ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे.
- साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने धुणे.
- परिसरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी.
पावसाच्या साचलेल्या पाण्यातून चालणे टाळवा. तसेच अतिजोखिम गटातील व्यक्तींना पालिकेच्या दवाखान्यात जाऊन प्रॉफिलायसिस घेता येईल. त्याचबरोबर पालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया पेजद्वारे यासंबंधी माहिती नागरिकांना वेळोवेळी दिली जाईल. डॉ. दक्षा शाह, कार्यकारी आरोग्य अधिकारी (मुंबई महापालिका)