मुंबई, दि. १२ : प्रतिनिधी मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. अशावेळी सर्वच प्राधिकरणे, महापालिका, प्रशासकीय यंत्रणा आणि वीजवितरण कंपन्या आता मुंबईतील पावसाळ्यासाठी सज्ज आहेत. याच प्राश्वभूमीवर आता मुंबईला वीजपुरवठा करणारी प्रमुख कंपी असणाऱ्या टाटा पॉवरने मुंबईमध्ये विनाअडथळा वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत. प्रतिबंधात्मक उपाय आणि सिस्टिम अपग्रेड करून पावसामुळे येणाऱ्या अडचणी प्रभावीपणे दूर करणे हे टाटा पॉवरचे उद्दिष्ट आहे.
टाटा पॉवरने मुंबईमध्ये आपल्या वितरण आणि ग्राहक सब-स्टेशन्समध्ये मान्सूनपूर्व तपासणी आणि देखभाल पूर्ण केली आहे. पुराचे पाणी रोखण्यासाठी पाणी बाहेर काढणारे पंप, ७००० पेक्षा जास्त फीडर खांब आणि जंक्शन बॉक्सेसच्या ठिकाणी जमिनीची झीज झाली आहे का ते तपासणे, सुरक्षेसाठी टीपीसी-डी सबस्टेशन आणि आतील रस्त्यांवर झाडांची छाटणी करणे, ट्रान्सफॉर्मर, फीडर खांब आणि मीटर रूम यासारख्या वीज इंस्टॉलेशन्सची उंची वाढवणे इत्यादी उपाय यामध्ये करण्यात आल्याची माहितीही टाटा पॉवरकडून देण्यात आली आहे.
आणीबाणीच्या प्रसंगी प्रतिसाद आणि सुरक्षा उपकरण
तयारी अजून जास्त मजबूत व्हावी यासाठी टाटा पॉवरने प्रमुख सबस्टेशन्समध्ये बचाव नौका आणि जीवन रक्षक जॅकेट उपलब्ध करवून देण्यात आले आहेत. कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगी तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक उपकरणांनी सुसज्ज वाहने प्रमुख ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. याखेरीज वीज खंडित होईल तेव्हा तात्काळ कार्यवाही केली जावी यासाठी सबस्टेशन्समध्ये आवश्यक सुटे भाग ठेवण्यात आले आहेत. मुंबईभर विविध नोड्सवर डेडिकेटेड क्विक रिस्पॉन्स टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत, ज्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतील. आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपकरणांनी सुसज्ज वाहने तयार आहेत आणि वितरण सबस्टेशन्समध्ये पाण्याच्या सर्व लाईन्स साफ करण्यात आल्या आहेत. यासोबतच, वॉटर लेव्हल सेन्सर, SCADA सिस्टिमच्या कमी खर्चाच्या सिग्नल ट्रान्समिशनसाठी LoRa (लॉन्ग रेंज) वर आधारित आयओटी डिव्हाईस, स्वयंचलित पम्पिंग सिस्टिम इत्यादींचा समावेश आहे.
ग्राहकांसोबत संवाद आणि सहायता
टाटा पॉवरने आणीबाणीच्या काळात वेगवान कनेक्टिव्हिटी आणि थेट संपर्क करता यावा यासाठी ग्राहक सेवा केंद्रे अपग्रेड करण्यात आली आहेत. ग्राहक आयव्हीआर (इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स) वर स्वयंचलित पद्धतीने तक्रार नोंदवू शकतात आणि २४X७ कॉल सेंटर, टाटा पॉवर मोबाईल ऍप आणि व्हाट्सएपमार्फत देखील समस्या नोंदवल्या जाऊ शकतात. या प्लॅटफॉर्म्समार्फत ग्राहकांच्या तक्रारी आणि वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्येचे त्वरित निवारण केले जाऊ शकते.
हे करा
१. मीटर केबिनमध्ये पाणी जमा झाल्यास किंवा गळती होत असल्यास मुख्य स्विच लगेच बंद करा.
२. वादळाचा अंदाज येताच विजेची उपकरणे अनप्लग करा.
३. पावसात तुम्ही इतरांना स्पष्टपणे दिसावे यासाठी रिफ्लेक्टिव्ह रेनकोट घाला.
हे करू नका
१. इमारतीच्या आतील कोणत्याही तारेला किंवा पाईपलाईनला स्पर्श करू नका
२. टेलिफोन लाईन/धातूचे पाईप यामध्ये विजेचा प्रवाह जाऊ शकतो याला हात लावू नका.
३. वादळ आणि पावसात कोणत्याही तात्पुरत्या इन्स्टॉलेशनच्या खाली आश्रय घेऊ नका.