समाजसमर्पित नानाराव ढोबळे

    04-May-2024
Total Views | 93

nana
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक नानाराव ढोबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यानिमित्ताने माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत नाशिक येथे उद्या, सोमवार, दि. ६ मे रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने त्यांचे संस्मरण करणारे हे लेख...
 
गोविंद श्रीधर ढोबळे तथा नानाराव ढोबळे यांचा जन्म दि. १ एप्रिल १९२४ रोजी जळगाव येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जळगाव येथे झाले. ते १९४२ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्याच वेळेस जळगावमध्ये संघशाखांचा प्रवेश झालेला होता. नाना मात्र मॅट्रिक होईपर्यंत शाखेत गेलेले नव्हते. मात्र, जळगाव परिसरात विद्यार्थीदशेतील नानांनी मित्रमंडळींच्या मदतीने अनेक छोटेमोठे सार्वजनिक कार्यक्रम केले. त्याच सुमारास वडीलबंधू कल्याण येथे नोकरीला गेल्याने नाना त्यांच्याकडे नोकरीसाठी गेले. काही काळ त्यांनी नोकरी केली. तेथेच त्यांचा रा. स्व. संघाशी संपर्क आला. कल्याणचे भगवानराव जोशी, दामोदर गोरे, वासुदेव देशपांडे, मुकुंदराव भोसले दामूअण्णा टोकेकर व माधवराव काळे या सर्वांचा सहवास त्यांना लाभला. त्यांचे जीवनध्येय नक्की झाले. त्यांनी संघकार्यात स्वतःला झोकून दिले. नोकरी सोडून ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून घर सोडून बाहेर पडले. संघाचा प्रचारक म्हणजे आपल्या ‘मीपणा’चे विसर्जन करून टाकणे. संघशरण वृत्तीमुळे जीवनाचा अन्वयार्थ समजला. या ध्येयाप्रति आपल्या जीवनाची वाटचाल करण्याचा मार्ग निश्चित झाला.
 
खडतर मार्ग
१९५० ते १९६२ या काळात धुळे जिल्हा हे त्यांचे कार्यक्षेत्र होते. धुळे जिल्ह्याचा बराचसा भाग वनवासी आहे. या काळात प्रचारकाला चणेफुटाणे खाऊन दोन-दोन दिवस काढावे लागत. डोंगरदर्‍यांतून पायपीटही करावी लागे. नानांनी हे सारे हसतमुखाने केले. धडगाव, अक्कलकुवा, नंदुरबार या सर्व क्षेत्रांत त्यांनी जनजागृती केली. येथील बांधवांसाठी पतपेढ्या, वसतिगृहे, सामूहिक शेती अशा रचनात्मक कार्याचा पाया घातला. पुढे १९६२ ते १९७१ या काळात नाना नाशिक विभाग प्रचारक (धुळे, नाशिक, जळगाव कार्यक्षेत्र) झाले. त्यानंतर १९७१ ते १९८६ म्हणजे मृत्यूपर्यंत नाना हे महाराष्ट्र प्रांताचे बौद्धिक प्रमुख होते.
हा कालखंड अत्यंत खडतर होता. १९४८ व १९७५ मधील या दोन संघबंदीच्या काळात अग्निदिव्यातून संघाला जावे लागले. स्वाभाविकच समर्पित संघ कार्यकर्त्यांची ही अग्निपरीक्षा होती. नानांच्या जीवनात ही अग्निपरीक्षा येऊन गेली. संघाचे पूर्णवेळ प्रचारक निघालेले असले, तरी जळगावचे त्यांचे घर हे संघाचे घर झालेले होते. परंतु, १९४८च्या गांधी हत्येमुळे उफाळलेल्या क्षोभात जळगावमधील त्यांचे तीनमजली घर बेचिराख झाले.
 
जीवनात आणीबाणीचा १८ महिन्यांचा अत्यंत कठीण कालखंड येऊन गेला आहे. देशभरात हजारो कार्यकर्ते कारागृहात स्थानबद्ध होते. त्यांच्या कुटुंबांची, व्यवसायांची वाताहत झाली होती. नानांसारखे अनेक कार्यकर्ते भूमिगत राहून सत्याग्रहाची आखणी करत. समाजजागृतीचे विविध मार्ग हाताळत. कारागृहात गेलेल्यांच्या कुटुंबीयांचे मनोधैर्य टिकवण्याचा प्रयत्न करीत. त्यांचे कुटुंब चालले पाहिजे, यासाठी आर्थिक मदतीची तरतूद करीत. हे सर्व करताना पोलीस यंत्रणेला चकवा देत सतत प्रवास, भेटीगाठी, गुप्त बैठका ही सर्व कामे नानांनी केली आहेत.
 
जनजाती विकास
शिंदखेडा तालुक्यात वनवासी सामुदायिक शेती प्रकल्पासाठी त्यांनी प्रेरणा दिली. त्यांच्या प्रेरणेतूनच नाशिकच्या सुंदर नारायण मंदिर विश्वस्तांनी दिलेल्या बाराशे एकर जमिनीवर जव्हार तालुक्यात सह्याद्री आदिवासी बहुसेवा संघाचे देवबांध केंद्र उभे आहे. तेथे वसतिगृह, गोपालन, औषधी वनस्पतींची लागवड, शेती प्रकल्प, जनजाती क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव, भाऊबीज भेट असे अनेक उपक्रम चालतात. नाशिक, जळगाव, धुळे व ठाणे या जिल्ह्यांतील जनजातीय क्षेत्रातील पट्ट्यात आज मोठ्या प्रमाणावर विकासाचे काम चालू आहे. त्याची प्रेरणा त्यांचीच आहे. मातृभूमीवरील संकटे, समाजाची त्याविषयी असलेली उदासीनता, संघटित राहण्याचा अभाव, त्याचबरोबर ग्रामीण वनवासी भागातील बांधवांचे आपल्याच बांधवांकडून होणारे शोषण आणि तरीसुद्धा उपेक्षित, वंचित घटकांमधून अनुभवास येणारे अत्यंत स्नेहाचे व संस्कारांचे वर्तन हे सांगताना नाना भावविवश होत.
 
वक्तृत्व कौशल्य
संघाची दैनंदिन शाखा, बैठका, संपर्क या विषयांवर नानांनी कार्यकर्त्यांना अत्यंत बारकाईने मार्गदर्शन केले. नानांच्या महाविद्यालयीन तरुणांच्या बैठका या विशेष आकर्षण असायच्या. हजारो तरुणांसमोर त्यांनी राष्ट्रविचारांच्या मार्गदर्शनाद्वारे प्रेरित केलेले आहे. उत्तम वाचन, व्यापक अनुभव, दांडगा जनसंपर्क, भक्कम वैचारिक अधिष्ठान, सखोल चिंतन आणि तळमळ यामुळे नानांचे वक्तृत्व प्रभावी असे. युवकांसमोरील त्यांच्या मांडणीत आक्रमकता असे. त्यांच्या युवा वृत्तीला आणि कार्यक्षमतेला ते आवाहन करीत. त्यांची वक्तृत्व शैली संभाषणात्मक असे. भाषा प्रभावी असे. आशय वैचारिक असे. हलक्याशा विनोदाचा शिडकावा असे. बालकांच्या समोर बोलताना छोट्या गोष्टींच्या माध्यमातून ते हाच विचार प्रभावीपणे मांडत. त्याचबरोबर संघाच्या बाहेरील जाहीर भाषणांच्या वेळी त्यांचे वक्तृत्व वेगळ्या पद्धतीचे असे. ते आव्हानात्मक व आक्रमक असे. नानांचे वक्तृत्व प्रभावी होते. त्यांनी विपुल लेखनही केले. त्यांच्या लेखनात व वक्तृत्वात लालित्यपूर्ण किंवा अलंकारिक शब्दांचा वापर नसे. पण, आलेले शब्द हे हृदयातून आलेले असल्यामुळे त्यातून एक वेगळी आत्मीयता डोकावत असे. त्यात समाजाविषयीची तळमळ आणि मातृभूमी भक्तीची उत्कटता असे. यातून सहजच स्फुरलेले त्यांचे वत्कृत्व अथवा त्यांचे लिखाण श्रोते आणि वाचकांच्या अंतःकरणात पोहोचत असे. या प्रेरणेने शेकडो कार्यकर्ते कार्यरत झाले.
 
कौटुंबिक मार्गदर्शन
संघप्रचारकाच्या दिनक्रमात भेटीगाठी, बैठका, शाखा, संपर्कासाठी कार्यकर्त्यांच्या घरी जाणे असते. अक्षरशः शेकडो कुटुंबीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. या कार्यकर्त्यांच्या घरातील ‘वहिनी’ नावाच्या अत्यंत महत्त्वाच्या घटकाशी नानांचा भोजनाच्या निमित्ताने दृढ स्नेह जडला. ही ‘वहिनी’ नावाची यंत्रणा संघकामात सक्रिय नसली तरी संघकार्यकर्त्यांच्या घरातला मोठा आधारस्तंभ असते. कार्यकर्त्यांची, कुटुंबीयांची आणि आल्यागेल्याची काळजी घेणे, हे ती हसतमुखाने करीत असते. अडचणी आल्या तरी मार्ग काढून आपले कर्तव्य ती पार पाडत असते. त्यामुळे संघकामातील या ‘वहिनी’ याविषयी महत्त्वाचे एक टिपण नानांनी केलेले आहे.
 
संघाचा पूर्णवेळ प्रचारक हा शेकडो कुटुंबांचा जिव्हाळ्याचा घटक असतो. त्यामुळे अनेक कौटुंबिक समस्यांमध्ये त्याचा शब्द स्वीकारला जातो. अशाच एका कुटुंबात वडीलबंधूंचे निधन झाले, तरुणपणीच वैधव्य आलेल्या त्या घरातील महिलेच्या दिराला त्यांनी ‘तूच का हा प्रश्न सोडवीत नाहीस?’ असे सुचवले आणि ते त्या कुटुंबाने सहजगत्या स्वीकारले. नाना हे ज्या कालखंडात मार्गदर्शन करत आहेत, तो कालखंड लक्षात घेतला तर त्यावेळी असे स्वीकारले जाणेदेखील किती अवघड असेल, हे आपण समजू शकतो. पन्नास-साठ-सत्तरच्या दशकातील त्यांच्या कार्यकाळात सामाजिक समरसतेच्या दृष्टीने आंतरजातीय विवाह होण्यासदेखील नानांनी दोन्ही कुटुंबांची समजूत काढणे, नवदाम्पत्यास वेळोवेळी मानसिक आधार देणे, हे काम त्यांनी सहजगत्या केले.
 
ज्येष्ठ संघ कार्यकर्ते कै. डॉ. श्रीपती शास्त्री यांनी त्यांचे वर्णन करताना असे म्हटले की, “इंग्रजी वाङ्मयात डेल कार्नेजी यांचे 'How to win friends and influence people' या नावाचे एक लोकप्रिय पुस्तक आहे. या पुस्तकात समाजात प्रभाव निर्माण करण्यासाठी कृत्रिमरीत्या व्यवहारात अवलंबायच्या सूचनावजा मार्गदर्शन दिलेले आहे. परंतु, नानाराव ढोबळे यांचे जीवन म्हणजे लोकांना प्रभावित करणेच नव्हे, तर त्यांना स्नेहाने जिंकणे म्हणजे काय असते, याचाच आदर्श वस्तुपाठ आहे. त्या दृष्टीने पुस्तकाच्याही पुढे कितीतरी पावले नानांनी आपल्या जीवनात टाकली आहेत.”
 
लेखन कौशल्य
संघकार्यासाठी पूरक असलेले, परंतु सर्व समाजाला प्रभावित करेल, असे लिखाण नानांनी केले. हे लेखन संस्कार करणारे असून प्रेरणादायक आहे. त्यांच्या लेखनात मातृहृदय डोकावते. केलेल्या कामाची जोड असल्याने ते वाचकांच्या हृदयाला भिडते. सामाजिक समता व समरसता, जनजाती कल्याण व स्त्रीच्या सन्मानातून स्त्रीशक्तीची जोपासना हे नानांच्या अतिशय जिव्हाळ्याचे विषय होते. समता व ममता यांच्या माध्यमातून समरसतेचा भाव समाजात जागृत करावा लागतो. सामाजिक संघटन बांधणार्‍यांना हे भान ठेवावे लागते. संघप्रचारकाला समाजात नित्य भ्रमंती करत शेकडो जणांना भेटावे लागते. त्यातून अत्यंत सामान्य वाटणार्‍या समाजघटकातदेखील काही असामान्य गुणांचे दर्शन घडत असते. हे समाजातील सत्प्रवृत्तीवरील विश्वास व श्रद्धा वाढवणारे असते. नानांच्या लेखनकौशल्यामुळे या विषयावरच्या नियमित लिखाणाचा स्तंभ संपादकांच्या आग्रहाखातर त्यांनी चालवला. ‘समाजतळातील मोती’ म्हणून त्याचे संकलन झालेले आहे.
 
नानांच्या कालखंडात सार्वजनिक जीवनात वावरणार्‍या कार्यकर्त्यांना आपल्या संघटनेतील कार्यकर्त्यांशी पत्रव्यवहाराद्वारे जोडून ठेवण्याचे कौशल्य होते. नानांचे व्यक्तिमत्त्व या पत्रव्यवहारातूनदेखील दिसते. पत्रातील सूर ज्येष्ठ असून, उपदेशाचा नाही. मित्रत्वाच्या नात्याने कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन मार्गदर्शन करणे आश्वासक भावना त्यांच्या पत्रव्यवहारातून व्यक्त होते.
सुमारे चार दशके महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील संघकामाच्या विस्तारात ज्यांचा मोलाचा सहभाग राहिला, असे नानांचे समाजसमर्पित व्यक्तिमत्त्व दि. १५ ऑगस्ट १९८६ रोजी शांतपणे इहलोक सोडून गेले. ‘की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने’ या पंक्तीप्रमाणे नानांचा जीवनप्रवास अखंडपणे सुरू होता. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने विनम्र अभिवादन!
-दिलीप क्षीरसागर
९४२२२४५५८२
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकरिणी सदस्य आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121