“मी ‘त्या’ रागात सावरकर चित्रपट बनवला”, रणदीप हुड्डाने कारण सांगत म्हटले, “त्यांचं योगदान आजही…”
27-May-2024
Total Views |
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा तर मिळवलीच पण आजवर विनायक दामोदर सावरकर यांचा जीवनकाळ जो कुणीही मोठ्या पडद्यावर मांडला नव्हता तो मांडण्याचे धाडस अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डा याने केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त नुकताच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले. यावेळी रणदीप हुड्डा या पुरस्काराचा मानकरी ठरला. रणदीपने हा पुरस्कार स्वीकारल्यावर मनोगत व्यक्त करताना एका रागाच्या भावनेत हा चित्रपट साकारल्याचे म्हटले. नेमकं तो काय म्हणाला जाणून घेऊयात...
मी रागात चित्रपट सिनेमा बनवला त्याचं कारण म्हणजे...
रणदीप हुड्डाने पुरस्कार स्वीकारल्यानंतर म्हटले की, "स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जेव्हा चित्रपट बनवायचा विचार केला तेव्हा मला याआधी त्यांच्याबद्दल माहित नव्हतं. मी जेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल वाचत गेलो, अभ्यास केला त्यावेळी मला कळलं की, मला वजन कमी करुन बारीक व्हावं लागेल. काळ्या पाण्याच्या शिक्षेचा अनुभव घ्यावा लागेल वगैरे. सावरकरांचं संपूर्ण आयुष्य हे त्याग आणि बलिदानावर आधारीत आहे. त्यांचं आयुष्य आजवर लोकांपर्यंत का पोहचवलं गेलं नाही? या रागाच्या भावनेत मी हा चित्रपट बनवला. सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहचवावेत, हा स्पष्ट माझा स्पष्ट हेतू होता”.
पुढे तो म्हणाला की, "सावरकर फक्त महान स्वातंत्र्यसैनिक नव्हते तर ते कवी आणि थोर समाजसुधारक सुद्धा होते. भारतात आजही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार लागू आहेत. सावरकरांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारायला मिळाली यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. लोकांना हा चित्रपट आवडला याचा मला आनंद आहे." दरम्यान २२ मार्च रोजी देशभरात प्रदर्शित झालेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट झी ५ या ओटीटी वाहिनीवर २८ मे पासून प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.