मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील २०००च्या काळातील चित्रपट गाजवणारा देखणा अभिनेता विवेक ओबेरॉय याचा एका चित्रपटावेळी भीषण अपघात झाला होता. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितले. २०० ४ साली अर्थात २० वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेल्या युवा या चित्रपटावेळी विवेकचा अपघात झाला होता आणि तो पाहिल्यानंतर दिग्दर्शक मनि रत्नम यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता.
विवेक ओबेरॉय याने झुमला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “त्या संध्याकाळी एका भीषण दुचाकी अपघातात माझा डावा पाय तीन ठिकाणी मोडला होता. मला आठवतं की माझ्यासोबत अजय देवगण आणि अभिषेक बच्चन होते. त्यांनीच मला दवाखान्यात नेले होते. मला खूप जास्त त्रास होत होता व माझ्या मोडलेल्या पायातून येणाऱ्या रक्तामुळे मी रक्ताने माखलो होतो,” असं विवेक ओबेरॉय ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
शिवाय त्या दिवसाची आणखी एक वाईट आठवण सांगताना विवेक म्हणाला की, “माझ्या अपघाताचा दिग्दर्शक मणि रत्नम यांना इतका मोठा धक्का बसला होता की त्यांना माझा अपघात पाहिल्यानंतर मणि अण्णांना हृदयविकाराचा झटका आला होता”.
२० वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेल्या युवा या चित्रपटात विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अभिषेक बच्चन, ईशा देओल, करीना कपूर आणि राणी मुखर्जी यांच्या भूमिका होत्या.