नवी दिल्ली: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर रविवारी कोसळले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ वर म्हटले की, भारत-इराण द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि इराणच्या लोकांप्रती माझ्या संवेदना. या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभा आहे.
इराणचे राष्ट्राध्यक्ष रायसी, परराष्ट्र मंत्री आणि इतर अधिकाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी इराणच्या वायव्य भागात डोंगराळ भागात कोसळले. यानंतर मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले. सोमवारी इराणने राष्ट्राध्यक्ष रायसी यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. याआधी पंतप्रधान मोदी यांनी रविवारी हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली होती.