
नवी दिल्ली : भारतीय मजदूर संघाचा (बीएमएस) ७० वा वर्धापन दिन केवळ औपचारिकता नसून, तो आत्मपरीक्षणाचा आणि पुढच्या वाटचालीचा संकल्प करण्याचा क्षण आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
‘बीएमएस कशासाठी स्थापन झाला, त्याला प्रेरणा काय होती, गेल्या ७० वर्षांत त्याने काय साध्य केले आणि पुढे काय करायचे आहे, याचा विचार करण्याची ही वेळ आहे. हा केवळ स्मरण सोहळा नाही, तर मूल्यांनी आणि दृष्टिकोनाने चाललेली चळवळ आहे, असे सरसंघचालक म्हणाले. बीएमएसच्या प्रारंभीच्या काळातील आठवणी सांगताना सरसंघचालक म्हणाले, दत्तोपंत ठेंगडींनी जेव्हा हे संघटना स्थापन केले, तेव्हा ती अगदी लहान होती. इतर संघटनांमधील लोक त्यांची थट्टा करायचे की, भगवा झेंडा कामगार क्षेत्रात कसा उंचावणार?, मात्र आज ७० वर्षांनी ठेंगडी यांचा तो विचार सिद्ध झाला असून हे फक्त बीएमएसच्या कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे शक्य झाले आहे.
‘सनातन धर्मात ‘तप’ हे जीवनाचे एक महत्त्वाचे अंग आहे, असे सांगून सरसंघचालक पुढे म्हणाले बीएमएसने जगाला एक नवा आणि शाश्वत मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. पहिली पिढी जी काम सुरु करते, दुसरी टिकवते आणि तिसरी-चौथी पिढी का आणि कसे करायचे, हे समजून घेत पुढे नेत असते. त्यामुळी बीएमएसच्या सध्याच्या पिढीकडे मोठी जबाबदारी असल्याची जाणीव सरसंघचालकांनी करून दिली.
बीएमएसला राष्ट्रहित, उद्योगहित आणि मजदूरहित या त्रिसूत्रावर उभे केलं, म्हणूनच आज ते जगाला आदर्श ठरले आहे. बीएमएसकडे भक्कम विचार आहे, पण तो कृतीत उतरवण्यासाठी योग्य पद्धती उभी करावी लागते. आज ५० वर्षांपूर्वी न विचारले गेलेले प्रश्न समोर आहेत. असंघटित क्षेत्र मोठे आहे, आणि संघटित क्षेत्रातही बरेच असंघटित कामगार आहेत. त्यांचा आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून द्यायला हवी आणि त्यासाठी बीएमएसने पुढे यावे, असेही सरसंघचालकांनी नमूद केले.