ऑपरेशन सिंदूर – लोकसभेत सोमवारी तर राज्यसभेत मंगळवारी चर्चा

    23-Jul-2025   
Total Views | 13

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा करण्याची तारीख आणि वेळ अखेर निश्चित झाली आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या महत्त्वाच्या चर्चेला लोकसभेत सोमवार, 28 जुलैपासून सुरुवात होणार असून, राज्यसभेत मंगळवारी, 29 जुलैला चर्चा होईल. दोन्ही सभागृहांत एकूण प्रत्येकी १६-१६ तासांची चर्चा होणार आहे.

विरोधकांकडून ही चर्चा तत्काळ म्हणजेच २४ जुलैलाच सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विदेश दौरा असल्याने सरकारने ती मागणी नाकारली. दरम्यान, चर्चेपूर्वी सरकारने आपली तयारी जोरात सुरू केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) अनिल चौहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि तीनही सेनाप्रमुखांसोबत सलग काही बैठकांत सरकारचा अधिकृत उत्तराचा आराखडा तयार केला आहे.

या चर्चेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबतच गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकरही सहभागी होणार आहेत. सरकारने या चर्चेत आक्रमक पावित्रा घेण्याची रणनीती आखली असून, २६ जुलैला येणाऱ्या करगिल विजय दिवसाच्या पार्श्वभूमीवर संसदेतही आपल्या यशांचा दाखला देत या चर्चेला ‘विजय’च्या रूपात साजरे करण्याचा सरकारचा मानस आहे.

दरम्यान, बुधवारी दोन्ही सभागृहांत विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आले. मंगळवारी संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर ‘दुहेरी भूमिका’ घेतल्याचा आरोप करताना सांगितले होते की, बिजनेस अ‍ॅडव्हायजरी कमिटीच्या बैठकीत विरोधकांनी पोस्टर न आणण्याचे मान्य केले होते. मात्र, नंतरही त्यांनी पोस्टर दाखवत गोंधळ घातला आणि चर्चा होऊ दिली नाही.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121