दैनंदिन जीवनात अनेक चांगल्या-वाईट घटनांचा अनुभव आपल्याला येतो. एखादी वाईट घटना आपल्याला दिसली की, ‘घोर कलियुग’ असे म्हणत, कलियुगाकडे बोट दाखवत, आपण आपले नैराश्य अधिक वाढवतो. रामावर भरवसा असणारे आणि ‘जे काही होते, ते रामाच्या इच्छेने होते’ असे म्हणत, त्या वाईट घटनेचा क्षण आपल्या मनपटलावरून हद्दपार करतात. पण, चिंताक्रांत मंडळी रामराज्य कधी येणार, असा विचार करीत, वर्तमानात जगण्याऐवजी रामराज्याची प्रतीक्षा करणेच पसंत करतात. पण, रामराज्य म्हणजे काय, हे जाणून घेण्याची देखील आवश्यकता आहे.
आपल्या अंतरमनातील रामाला आपण कधीच स्मरत नाही. दुसर्या व्यक्तीतील हृदयस्थ रामालाही आपण धुडकावून लावतो. हे सगळे होऊ नये आणि रामराज्य नक्की काय होते, हे समजावे, यासाठी एका रामभक्ताने ’रामराज्य’ या छोटेखानी पुस्तिकेचे लेखन केले आणि ते जनमानसात पोहोचावे म्हणून त्या दासचैतन्याची धडपड सुरू आहे.
गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रहित असणारे, दासचैतन्य म्हणजेच संदीप सुंकले यांची ओघवती, मृदु पण तेवढीच स्पष्ट असलेली भाषा रामराज्याची महती सांगते. लव-कुशांनी सांगितलेल्या प्रभू रामचंद्रांच्या महतीबाबत आपण सर्वजण जाणतोच. त्या रामरायांचे रामराज्य कसे होते, हे सुंकले त्यांच्या सिद्धहस्त लेखणीद्वारे प्रभावीपणे वाचकांपर्यंत पोहोचवतात.
शुद्ध आहार-विचार-आचार म्हणजे रामराज्य, शुद्ध आस-ध्यास-व्यास म्हणजे रामराज्य, शुद्ध जल-स्थल-बल म्हणजे रामराज्य, शुद्ध भावना-कल्पना-वासना म्हणजे रामराज्य, शुद्ध मन-तन-धन म्हणजे रामराज्य, शुद्ध वर्ण-कर्म-धर्म म्हणजे रामराज्य, शुद्ध जांबुवंत-हनुमंत-नलनील म्हणजे रामराज्य, शुद्ध राम-सीता-लक्ष्मण म्हणजे रामराज्य, शुद्ध कुटुंब-समाज-राष्ट्र म्हणजे रामराज्य असे नऊ लेख म्हणजे रघुकुळातील सात्विकतेची बीजे आहेत. केवळ दहाच लेख आणि प्रत्येक लेखातील ओजस्वी भाषा, ज्यातून रामराज्याची संकल्पना अधिक समृद्धतेने उलगडत जाते. रामराज्य आणायचे असेल, तर भौतिक सुखाच्या मागे धावणे सोडण्याची गरज आणि भोगांपुढे लोटांगण न घालणेच अधिक श्रेयस्कर असल्याचे लेखक सूचवतात.
बारामतीच्या कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. रेवती राहुल संत यांची प्रस्तावना लाभलेल्या, या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण म्हणजे प्रभू रामचंद्रांनी तुमच्या-आमच्यातील अवगुणांवर केलेला शस्त्राघात आहे. सध्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक स्थितीकडे पाहताना येणारे नैराश्य स्वाभाविकच आहे; पण ते नैराश्य, मरगळ झटकून रामराज्य येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज लेखकाने अधोरेखित केली आहे.
रामराज्यातील विचारांमधील सौम्यता आणि आधुनिक काळात परिस्थितीत झालेला बदल यावर टोकदार भाष्य करताना, सुंकले यांनी विज्ञानाची कास सोडलेली नाही, हेदेखील तितकेच महत्त्वाचे. संस्कार, संस्कृती यांच्याबद्दलचा विचार करीत असतानाच, विचार-भावना-वर्तन यांवर मानसशास्त्रीय अंगाने केले जाणारे भाष्य करताना, समर्थांच्या मनाच्या श्लोकाबद्दलही लेखक भाष्य करतात. मनाचे श्लोक आणि मनापासून करण्याची सुधारणा त्यांनी वेळोवेळी या ‘रामराज्य’ पुस्तकात मांडली आहे. प्रभू रामचंद्राबद्दल, त्यांच्या राज्याबद्दल लिहीत असताना, लेखकाने त्यांच्या दासाचा म्हणजेच मारुतीरायांचा उल्लेख केला नसता तरच नवल!
हनुमंताप्रमाणेच लक्ष्मणाचे रामचंद्रांचे भाऊ म्हणून नाही, तर त्यांच्या देदीप्यमान बंधू प्रेमाविषयी लिहिले नाही, तर ‘रामराज्य’ ही संकल्पना अर्धवटच राहिली असते; पण त्यांचा यथायोग्य उल्लेख यात आढळतो. रामतत्त्वांचे मूल्य जाणून घेतल्याने, त्यासाठी आवश्यक निश्चय आणि मार्गक्रमण केल्यास ‘रामराज्य’ येण्यास वेळ लागणार नाही, याविषयी लेखकाच्या मनात कोठेही किंतू जसा नाही, तसेच शुद्ध निश्चयाने मार्गक्रमण केल्यास, लवकरच रामराज्य येऊ शकते. याबद्दल लेखकाला केवळ आशाच नाही, तर खात्रीदेखील आहे.
पुस्तकाचे नाव : रामराज्य
लेखक : संदीप सुंकले
प्रकाशक : संकल्प प्रकाशन, अलिबाग.
पृष्ठसंख्या : ६४,
मूल्य : १००
नितीन भावे