रवींद्र वायकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

    10-Mar-2024
Total Views |
Ravindra Waikar Shivsena


मुंबई :   उबाठा गटाचे आ. रवींद्र वायकर यांनी शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आ. वायकरांनी काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उध्दव ठाकरेंनी दि. ०९ मार्च रोजी रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघाला भेट दिली होती. यावेळी रवींद्र वायकर आणि उध्दव ठाकरे यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चादेखील झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज लगेच वायकरांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

रवींद्र वायकर यांचा बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे, अशी भावना पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, देशामध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विकासाचे पर्व सुरू असून जगात देशाची मान उंचावली आहे. याच विकासाच्या दृष्टिकोनातूनच रवींद्र वायकर यांनी आपल्या सरकारवर विश्वास ठेवला आहे. मतदारसंघातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वायकरांनी पक्षात प्रवेश केला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

वायकरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने समज-गैरसमज दूर झाले असून मतदारांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले. तसेच, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आपलं सरकार काम करत असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले. शिंदे गट शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर रवींद्र वायकर यांनी आपण पक्षात ५० वर्षे झाली आहेत काम करतो आहे. तसेच, आपल्या मतदारसंघातील कामे पूर्ण करण्याकरिता शिवसेनेत पक्षात सहभागी झालो आहे, असे पक्ष प्रवेशानंतर रवींद्र वायकर म्हणाले. आरे सर्वोदय नगर आदी माझ्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मी हा पक्षप्रवेश करत आहे.


जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी

आमदार रवींद्र वायकर यांची गैरव्यवहाराप्रकरणी ईडीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. जोगेश्वरी येथील कथित भूखंड घोटाळा प्रकरणाची चौकशी सुरू असून वायकर कुटुंबीयांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. एकंदरीत, वायकर यांची अलीकडेच ईडीने सखोल चौकशी केली होती. जोगेश्वरीत राखीव भूखंडावर हॉटेल उभारून आर्थिक फायदा उकळल्याबद्दल वायकर यांच्या विरोधात ईडीने चौकशी सुरू केली आहे. महत्त्वाचे म्हणजे रवींद्र वायकर यांच्या पत्नीच्या विरोधातही या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. अशा रीतीने या घोटाळाप्रकरणी वायकर कुटुंबीयांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे.


उध्दव ठाकरेंना मोठा धक्का

दरम्यान, आ. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच, वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. याआधीच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे व वायकर कुटुंबीयांवर रायगड जिल्ह्यात बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात आरोप केला होता. जोगेश्वरीमध्ये राखीव भूखंडावर वायकर यांनी आधी क्लब व नंतर हॉटेलचे बांधकाम सुरू केले होते. या प्रकरणात वायकर यांनी पैशांचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121