हिंदूंच्या ३१ वर्षांच्या लढ्याला यश! ज्ञानवापीत मध्यरात्री पार पडली पूजा
01-Feb-2024
Total Views |
लखनौ : वाराणसीतील ज्ञानवापी परिसरातील व्यासजींच्या तळघरात ३१ वर्षांनंतर हिंदूंना पूजा करता आली. दि. १ फेब्रुवारीच्या मध्यरात्री एक वाजता पूजा करण्यासाठी भाविक व्यासजींच्या तळघरात पोहोचले होते. दि. ३१ जानेवारी २०२४ बुधवारी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने हिंदू पक्षाला ज्ञानवापी परिसरातील तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला होता. यासाठी न्यायालयाने वाराणसीच्या जिल्हा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
न्यायालयाच्या आदेशानंतर मशिदीच्या तळघरात प्रवेश रोखण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स हटवण्यात आले. १९९३ पर्यंत तिथे हिंदू पक्ष नित्यनेमाने पूजा करत होता. पंरतू, १९९३ मध्ये मुलायम सिंग यांच्या काळात हिंदू पक्षाला ज्ञानवापी परिसरात पूजा करण्यास बंदी घालण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध हिंदू पक्ष न्यायालयात गेला होता. तब्बल ३१ वर्षांनंतर न्यायालयाने हिंदू पक्षाला पुन्हा एकदा पूजेचा अधिकार दिला आहे.
न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावी करण्यासाठी आलेले वाराणसीचे जिल्हा अधिकारी यांनी सुद्धा यावेळी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे." या आदेशाला मुस्लीम पक्षाने उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.