महाराष्ट्रातील प्रमुख राममंदिरे (भाग ४)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्थापित ‘होळकर राम मंदिर, पंढरपूर

    21-Dec-2024
Total Views | 44

 Ram temples
महाराष्ट्रातील प्रमुख राम मंदिरांची माहिती आपण घेत आहोत. त्यामध्ये नाशिकचे श्री काळाराम मंदिर, रामटेकचे राम-सीता गडमंदिर, समर्थ रामदास स्थापित चाफळचे राम मंदिर, नामयोगी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज स्थापित दोन राममंदिरे, फलटणच्या राजे नाईकनिंबाळकर यांचे राममंदिर आदींची आपण माहिती घेतली आहे. आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये चंद्रभागा घाटावर स्थापित राम मंदिराची माहिती घेऊ. अहिल्यादेवींचे त्रिशताब्दी वर्ष सर्वत्र साजरे होत आहे. अहिल्यादेवी या शिवभक्त होत्या व त्यांनी सोमनाथ ते काशी विश्वनाथ अशा सर्व ज्योतिर्लिंग मंदिरांचा जीर्णोद्धार केला, हे सर्वश्रुत आहे. पण, त्यांनी पंढरपूरमध्ये स्थापन केलेले राम मंदिर फारसे परिचित नाही.

बरवे बरवे पंढरपूर। विठुरायाचे नगर।
 
भूवैकुंठ म्हणून संतांनी गौरव केलेले श्रीक्षेत्र पंढरपूर म्हणजे वारकरी भक्त-भाविकांच्या लाडक्या विठुरायाचे नगर. संतांचे माहेर. मंदिरे आणि असंख्य मठांचे गाव. विठ्ठल हा समस्त मराठी माणसांचा देव आहे. 12व्या शतकातील देवगिरीच्या यादव राजघराण्यापासून ते थेट छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, श्रीमंत पेशवे यांच्यापर्यंत सकल राजे, सरदार यांनी विठ्ठल मंदिरास वेळोवेळी देणग्या देऊन मंदिराचा विकास व विस्तार केलेला आहे. एवढेच नव्हे, तर परोपकार म्हणून अनेक धर्मशाळाही बांधल्या आहेत. विठ्ठलभक्तांच्या सोईसाठी बहुतेक सर्वच राजांनी व सरदारांनी पंढरपुरात छोटी-मोठी जनसेवेची कार्ये केलेली आहेत. त्यामध्ये इंदोरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी चंद्रभागा नदीच्या महाद्वार घाटावर बांधलेले श्रीराम मंदिर विशेष आहे. महाद्वार घाटांच्या डाव्या बाजूला शिंदे सरकारांचे द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर आहे, तर उजवीकडे भव्य असे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्थापित श्रीराम मंदिर डोळ्यात आहे.
 
अहिल्यादेवी होळकर यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती, विठ्ठलाच्या विष्णू-शिव एकरूप हरिहर स्वरूपावर त्यांची विशेष भक्ती होती. ‘शिव तोचि विष्णू आणि विष्णू तोचि शिव’ असा समन्वयी अद्वैत भक्ती विचार अहिल्यादेवींच्या एकूण धर्मकार्याचे अधिष्ठान होते. म्हणूनच देशभर शिव मंदिरांचा भव्य दिव्य रूपात जीर्णोद्धार करून स्वधर्माचा स्वाभिमान जपणार्‍या शिवभक्त अहिल्यादेवींनी पंढरपूरमध्ये श्रीविष्णूचा अवतार असलेल्या श्रीराम मंदिराची स्थापना केली. हा त्यांचा धार्मिक समन्वयाचा विचार हिंदू ऐक्य निर्माण करणारा राष्ट्रविचारच होता.
 
पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचा जन्म महाराष्ट्रात चौंडी येथे झाला असून, त्या महाराष्ट्रकन्या आहेत. इ. स.1766 ते 1795 अशी 30 वर्षे त्यांनी महेश्वर येथून राज्यकारभार केला. त्या धर्मपरायण व प्रजावत्सल राज्ञी होत्या. त्यांनी शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला व इस्लामी धर्मांध आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या हिंदू मानचिन्हांची स्वाभिमानपूर्वक पुनःश्च प्रतिस्थापना केली. या सार्‍या धार्मिक दानधर्म व जीर्णोद्धारासाठीचा पैसा त्यांनी आपल्या खासगी जहागिरीच्या उत्पन्नातून केला. ‘इंदूर होळकर स्टेट’चा एक पै ही खर्च केला नाही. हा त्यांचा आदर्श सर्व सत्ताधिशांनी अनुकरण करावा, असा वस्तुपाठ आहे. अशा शिवभक्त अहिल्याबाई यांचा पंढरपूरमध्ये भव्य वाडा व शिवमंदिरच बांधण्याचा विचार होता. पण, त्यांच्या हातून श्रीराम मंदिर निर्माण झाले, त्याची एक आश्चर्यकारक आख्यायिका आहे.
 
अहिल्याबाईंना मुळातच अनेक मंदिरे असलेल्या पंढरपूरात केवळ आणखी एका मंदिराची भर घालायची नव्हती, तर पंढरपूरच्या प्रमुख चार यात्रांना जमणार्‍या लाखो वारकर्‍यांच्या सोईसाठी एक मोठी धर्मशाळा, निवासस्थान वाडा बांधायचा होता. त्या वाड्याचे बांधकामाच्या पायासाठी जमिनीत खोदकाम करताना कामगारांना एक मारूतीची सुंदर वैशिष्ट्यपूर्व अशी मूर्ती सापडली. तेव्हा हा एक ईश्वरी संकेत आहे, असे वाटून त्यांनी भव्य वाड्याच्या एका भागात श्रीराम-सीता-हनुमंताचे मंदिर बांधण्याचा मनोदय केला आणि विठुरायाच्या पंढरीनगरीमध्ये श्रीराम-सीता मंदिराची पायाभरणी झाली. इ.स.1754 साली ही भूमिपूजनाची ऐतिहासिक घटना घडली. अखेर 12-13 वर्षांनी ते काम पूर्णत्वास जाऊन इ.स.1767 साली चैत्र पाडव्याला वास्तुशांती होऊन वाड्यावर भव्य गुढी उभारली गेली आणि श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा संपन्न होऊन मंदिर लोकार्पण करण्यात आले. चैत्र पाडवा ते हनुमान जयंती राजेशाही थाटात पहिला रामनवमी उत्सव साजरा झाला. ती रामनवमी जन्मोत्सवाची परंपरा 257 वर्षे झाली आजही अखंड, अव्याहत सुरू आहे. पहिल्या रामनवमी उत्सवाला व मंदिर उद्घाटनास स्वतः अहिल्याबाई, त्यांचे राजदरबारी मानकरी, पेशव्यांचे प्रतिनिधी, अनेक सरदार, जहागिरदार एवढेच नव्हे तर छ.शिवाजी महाराजांच्या सातारा गादीचे श्रीमंत छ. शाहूजी महाराज स्वतः जातीने उपस्थित होते. या उत्सवानिमित्त अहिल्यादेवींनी खूप मोठा दानधर्म केला. पुढे सुमारे एक महिनाभर अहिल्याबाईंनी पंढरपुरातच मुक्कम केला आणि विठ्ठलभक्तीच्या आनंदकल्लोळात आत्मानंदाचा अनुभव घेत त्यांनी नामभक्ती साधना केली.
 
महाद्वार घाट ते कुंभारघाट अशा या विस्तीर्ण होळकरवाड्याच्या दक्षिण भागामध्ये हे श्रीराम मंदिर असून, मुख्य वाड्यातून पाच-सात पायर्‍या उतरून राम मंदिरामध्ये प्रवेश करता येतो. गाभारा, दोन वेगवेगळे मंडप आणि राम मंदिर गाभार्‍या समोर स्वतंत्र मंडपातील हनुमान मंदिर अशी या देवळाची रचना आहे. गाभारा चार-पाच फूट उंच असून गाभार्‍यात तीन फुटी चौथर्यावर श्रीराम, सीता, लक्ष्मणाच्या संगमरवरी सुंदर मूर्ती आहेत. अहिल्यादेवींच्या निर्वाणानंतर दोन वर्षांनी गाभार्‍यात श्रीराम चरणाजवळच अहिल्यादेवींची हात जोडलेली मूर्ती काशीराव दादा होळकर यांच्या हस्ते स्थापन करण्यात आली आहे. गाभार्‍यास स्वतंंत्र प्रदक्षिणा मार्ग आहे. अहिल्याबाई यांनी बांधलेला हा ऐतिहासिक वाडा दोन एकर जागेत पसरला असून, दोन चौकांचा आणि 125 खणांचा लाकडी वाडा आहे. इ. स. 1966 सालापर्यंत या होळकर वाड्यात वारकरी भाविकांची विनामूल्य राहण्याची व भोजनाची व्यवस्था सुरू होती. संस्थाने खालसा झाल्यानंतर ती व्यवस्था बंद पडली. रामा समोरील मंडपात स्वतंत्र गाभार्‍यात मारुतीची स्थापना केलेली आहे. ही मारुती मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण दासमारुती प्रकारची आहे. त्याला त्याचे वैशिष्ट्यपूर्ण रूप पाहून श्री ‘विठ्ठलावतारी मारुती’ म्हणतात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या परोपकारी धार्मिक कार्यांपैकी एक कार्य, पंढरपूरश्रेत्री होळकर वाडा व श्रीराम-विठ्ठलावतारी मारुती मंदिर रूपाने आपल्याला पुढे प्रेरणाचा नंदादीप आहे.

विद्याधर ताठे
अग्रलेख
जरुर वाचा
सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले

सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले 'नो स्मोकिंग'चे फलक

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दादर पश्चिम येथील इंद्रवदन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या आजूबाजूला सतत धुम्रपान चालू असल्याने लोक त्रस्त झाले होते. सोसायटीशेजारी एक कार्यालय आणि मॉल असून तिथे काम करणारे लोक दिवसभर सिगारेट ओढण्यासाठी सोसायटीच्या कुंपणाजवळ येतात. त्यांच्या धुराचा त्रास सोसायटीच्या प्रत्येक घरात जाणवतो. खिडक्या बंद करूनही धूर घरात येतो, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास होतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आता आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121