मुंबई : ‘सुशीला-सुजीत’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक एकत्र येत असून हा चित्रपट पुढील वर्षी २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची दोन महिन्यांपूर्वी घोषणा झाल्यानंतर या चित्रपटाबद्दल रसिक आणि चित्रपटसृष्टीत मोठी उत्कंठा लागून राहिली आहे.
चित्रपटाच्या नावापासून सुरू झालेली उत्कंठा या चित्रपटात सुशीला कोण आणि सुजीत कोण या बहुचर्चित प्रश्नापर्यंत ताणली गेली होती. मात्र या दोन भूमिकांमध्ये कोण असणार याचे उत्त्तर देताना निर्मात्यांनी सुशीलाच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी असेल तर सुजितच्या भूमिकेत स्वप्नील जोशी असेल असे नुकतेच जाहीर केले आहे.
स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे, निलेश राठी यांची निर्मिती असलेल्या ‘सुशीला-सुजीत’चा मुहूर्त गेल्या आठवड्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेवून पार पडला आणि त्याच्या चित्रीकरणालाही धडाक्यात सुरुवात झाली आहे.
स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हे दोन अभिनेते मित्र पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. शिवाय स्वप्नील,सोनाली आणि प्रसाद पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत असल्याने चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि पंचशील एन्टरटेन्मेंट्सची ही निर्मिती आहे. प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे हे पहिल्यांदाच एकत्र येवून चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. प्रसाद ओक हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर संजय मेमाणे हे सिनेमॅटोग्राफर असून हे एक यशस्वी कॉम्बिनेशन मानले जाते. पटकथा-संवाद अजय कांबळे यांचे आहेत. चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
“सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक आणि मी पहिल्यांदाच एकत्र येत असून या चित्रपटामुळे तो योग जुळून आला आहे. माझ्यासाठी हे खूप एक्सायटींग आहे आणि या चित्रपटात खूप सर्जनशील गोष्टी घडणार आहेत आणि तो एक ऊर्जाभारा अनुभव असणार आहे,” असे स्वप्नील जोशी म्हणाला.
“सोनाली आणि स्वप्नील हे थोडेसे वेगळे आणि फ्रेश असे कास्टिंग या चित्रपटासाठी आम्ही केले आहे. या दोघांची एक वेगळी अशी काम करण्याची पद्धत आहेत आणि त्यामुळे ही निर्मिती प्रक्रिया अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे,” असे प्रसाद ओक म्हणाला.
सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक यांच्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाबाबत बोलताना स्वप्नील जोशी म्हणाला, “प्रसाद, सोनाली आणि मी गेली कित्येक वर्षे एकमेकांना ओळखतो आणि आम्ही चांगले मित्र आहोत. पण आम्ही एकमेकांबरोबर काम केलेले नाही. दोनेक वर्षांपूर्वी प्रसाद एक चित्रपट दिग्दर्शित करत होता आणि मी त्यात काम करणार होतो. पण काही कारणामुळे ते काही जुळून आले नाही. मग ‘सुशीला-सुजीत’ची निर्मिती सुरु झाली आणि आम्हीही संधी साधायचीच असे ठरवून टाकले.”