मुंबई : ( Nalasopara TC Suspension ) मुंबई, मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अतूट समीकरण. मात्र, नालासोपाऱ्यातील एका धक्कादायक प्रकाराने सोशल मीडियासह सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. नालासोपाऱ्यातील एका मुजोर टीसीने रेल्वेमध्ये मराठी भाषेत बोलणार नाही, अशी लेखी हमी एका मराठी दाम्पत्याकडून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घडलेला हा प्रकार समजताच मराठी एकीकरण समितीच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, रितेश मौर्या असे या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे. रेल्वे प्रवासी अमित पाटील आणि त्यांच्या पत्नी सोबत हा प्रकार रविवारी दि. ३ नोव्हेंबरला रात्री साडे आठ ते नऊच्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्थानकात घडला आहे. टीसीने त्याच्या कार्यालयात या दाम्पत्याला डांबून ठेवले होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, यानंतर प्रकरणाला वाचा फुटली.
नेमकं काय घडलं ?
अमित पाटील, असे त्या रेल्वे प्रवाशाचे नाव असून रविवारी रात्री ८.३० ते ९ च्या सुमारास ते पत्नीसोबत रेल्वेने प्रवास करत होते. तेव्हा नालासोपारा स्टेशनवर कर्तव्यावर असणाऱ्या तिकीट तपासणीस रितेश मौर्या यांनी तिकीट तपासणीसाठी अमित यांना थांबवले व तिकीटाची विचारणा केली. मात्र अमित यांना टीसीची भाषा समजली नाही. त्यांनी टीसीशी मराठीत संवाद साधला व मराठीत बोलण्यास सांगितले. तेव्हा टीसीने दादागिरी करत ‘हम इंडियन है हिंदी मे बोलेंगे, रेल्वे मे मराठी नहीं चलेगा’, असे अरेरावीचे उत्तर त्यांना दिले. त्यानंतर अमित आणि त्यांच्या पत्नीला आरपीएफ कार्यालयात बसवून ठेवले तसेच मी मराठी भाषेचा आग्रह धरणार नाही, मराठी भाषेची मागणी करणार नाही असे पाटील दांपत्याकडून लेखी हमीपत्र लिहून घेतले असा आरोप आहे.
मनसेची आक्रमक भूमिका
"मनमानी कारभार सुरू आहे. ठोस भूमिका घ्यायला कुणी तयार नाही. मराठी माणसांसाठी लढणारी आणि संघर्ष करणारी मनसे आहे. सत्तेत बसणारा पक्षाने या गोष्टींकडे गांभीर्याने पाहिले नाही तर जनतेने त्यांना सत्तेतून उतरवायला हवे", अशी प्रतिक्रिया मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे.
मराठी एकीकरण समिती आक्रमक
घडलेली घटना वसई विरार मराठी एकीकरण समितीला समजताच ते आक्रमक झाले. नालासोपारा रेल्वेस्थानकावर मराठी एकीकरण समितीने ठिय्या आंदोलन करून रेल्वे प्रशासनाला जाब विचारला.
टीसीचे निलंबन
दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची रेल्वेने दखल घेतली आहे. मराठी दांपत्याला अशी वागणूक देणाऱ्या, मुजोरपणे वागणाऱ्या टीसीचे वर्तवणूक उघडकीस आल्यावर मराठी एकीकरण समितीने केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर तिकीट तपासनीस रितेश मौर्या यांचे तात्पुरत्या स्वरूपात निलंबन करून, वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांना या घटनेचे तपशील देण्याचे आदेश देण्यात आले आहे.