भाजपच्या बंडखोर उमेदवार विशाल परबांवर पक्षाकडून निलंबनाची कारवाई

    05-Nov-2024
Total Views | 89
 
vishal parab
 
मुंबई : ( Vishal Parab )आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दि. ४ नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. राज्यातील अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांनी माघार न घेता आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीनंतर देखील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अखेर परब यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
 
महायुतीमध्ये सावंतवाडीची जागा शिंदे गटाकडे असून तिथून दीपक केसरकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात बंडखोरी करुन विशाल परब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या नेत्यांचे आदेशाचे पालन न केल्याने तसेच पक्षविरोधी भूमिका घेऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजप जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत यांनी विशाल परब यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
 
याबाबत प्रभाकर सावंत यांनी विशाल परब यांना पत्र दिले आहे. ज्यामध्ये भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. महायुतीचे उमेदवार केसरकर असल्यामुळे त्यांच्या विरोधात काम करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई पक्षाकडून केली जाणार अशी ताकीदही दिली आहे. दरम्यान सावंत यांनी अश्या आशयाच्या पत्राद्वारे कळवून सूचित केले आहे की यावेळी विशाल परब यांच्या सोबत असणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
 
काय म्हटलं आहे पत्रात ?
 
पत्रात असे म्हटले आहे की, "भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल प्रभाकर परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून पक्षाच्या वरिष्ठांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना देवूनही त्यान आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे. ही बाब पक्ष शिस्तीच्या विरोधी आहे. त्यामुळे प्रदेशाच्या सूचनेनुसार जिल्हा यांना दिलेल्या अधिकारातून त्यांच पक्षाच्या आता कार्यरत असलेल्या पदावरुन निलंबन करण्यात येत आहे. तसेच त्यांचे भाजपा प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात येत असून यापुढे त्यानी आपल्या प्रचारात किंवा अन्य बाबीसाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पक्षाचे नाव, पद आणि पक्षाच्या नेत्यांची नावे किंवा फोटो वापरू नये असे बजावण्यात येत आहे. तसे आढळल्यास त्यांच्याव कडक कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांच्या या पक्षविरोधी कामात त्याना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात येते की, पक्षातून निलंबित केलेल्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारची मदत केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी." असेही सांगितले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121