मुंबई : ( Pravin Darekar on Jitendra Awhad ) राष्ट्रवादी काँग्रसचे शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते यावर प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. अशातच आव्हाडांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी जहरी टीका केली आहे.
"आव्हाडांना पातळी राहिली नाही, ते विकृत राजकीय पुढारी आहेत. विषारी सापाच्या तोंडातून हिरवे फुत्कार मतांच्या लालसेपोटी करत आहेत", अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांवर प्रवीण दरेकरांनी निशाणा साधला आहे. तसेच "एका बाजूला जितेंद्र आव्हाडांनी उभ राहावं, दुसऱ्या बाजूला अजित पवार यांनी उभ राहावं आणि मग तुलना करावी", अशा शब्दात दरेकरांनी आव्हाडांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाडांविरुद्ध संपूर्ण महायुती एकत्र उभी ठाकल्याचे बघायला मिळत आहे.
दरेकरांच्या उपस्थितीत आज शिराळा येथे मेळावा
भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. सोमवार, ४ नोव्हेंबर २०२४ रोजी शिराळा येथे महाडिक युवा शक्ती संघटनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिराळा विधानसभा क्षेत्राचे भाजपा निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक यांनी या भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. शिराळा विधानसभा क्षेत्रात भाजपा महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ ‘विजयाचा निर्धार’ करण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजता सोमवार पेठ, पोटे चौक ३२ शिराळा येथे हा भव्य मेळावा आ. प्रविण दरेकरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या मेळाव्याला भाजपा महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.