मुंबई : (Aaditya Thackeray) शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा थेट उल्लेख करत आदित्य ठाकरेंना इशारा दिला आहे. आदित्य ठाकरेंनी गुरुवारी दि. १४ नोव्हेंबर रोजी दापोलीतील सभेमध्ये सडकून टीका केल्यानंतर रामदास कदम यांनी प्रत्युत्तर देत पुन्हा महायुतीचे सरकार आले तर आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतील असा थेट इशारा दिला आहे.
काय म्हणाले रामदास कदम?
"दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव होते. आमची सत्ता आल्यावर त्या प्रकरणाची पुन्हा चौकशी लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही," असं रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना इशारा देताना म्हटलं आहे.
तसेच पुढे बोलताना आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत, "आदित्य ठाकरे रात्री १२ वाजता घराबाहेर जाऊन सकाळी पाच वाजता येतो. याचे रात्रीचे धंदे महाराष्ट्रासमोर यायला पाहिजेत," असं रामदास कदम यांनी म्हटले आहे.
"आपली औकात बघून आदित्यने बोलावं, शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आम्ही केसेस अंगावर घेतल्या, तुरूंगात गेलो, पण त्यांचे पक्षासाठी काय योगदान आहे?", असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
दापोलीतील सभेत आदित्य ठाकरेंनी थेट कोणाचाही उल्लेख न करता, इथेही एक गद्दार आहे. तो दादागिरी करतो, रडतो असं म्हणत अप्रत्यक्षपणे रामदास कदमांवर निशाणा साधला होता. याचेच जोरदार प्रत्युत्तर रामदास कदमांनी दिले आहे.