बालविरांची उंच भरारी

    15-Nov-2024
Total Views | 26
 
Happy Children Day
 
नुकताच बालदिन साजरा झाला. खरं तर बालपण हे खेळण्या-बागडण्याचे वय. पण, काही मुले या खेळण्या-बागडण्याच्या वयातही उंच भरारी घेतात, की ज्यामुळे कायमच त्यांच्या कामगिरीचे कौतुक आणि आश्चर्यही वाटते. अशाच विविध क्षेत्रांत बालवयातच आपला ठसा उमटविणार्‍या बालवीरांचा बालदिनानिमित्ताने
हा अल्पपरिचय...
‘दुर्गकन्या’
 
शर्विका म्हात्रे ही वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी १०० गडकिल्ले सर करण्याचा विक्रम करणारी बाल गिर्यारोहक. शर्विका अगदी लहानपणापासूनच आईवडिलांसोबत गडकिल्ल्यांवर जायची. ती अवघी अडीच वर्षांची असताना, तिचे आईबाबा तिला घेऊन कलावंतीण दुर्गावर घेऊन गेले. त्या दुर्गावर शर्विका सरसर गडाच्या पायर्‍या चढत असताना, तिथे गिर्यारोहणासाठी आलेल्या काही लोकांनी तिचे व्हिडिओ काढले आणि ते समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. तेव्हापासून एक ‘दुर्गकन्या’ आणि ‘शिवकन्या’ म्हणून लोक शर्विकाला ओळखू लागले आणि गिर्यारोहणाच्या दिशेने शर्विकाचा खरा प्रवास सुरू झाला. शर्विकाचा अभ्यास आणि इतर गोष्टी सांभाळून तिचे आईवडील तिला दर आठवड्याच्या शेवटी गिर्यारोहणाला घेऊन जातात. शर्विकाचे वर सात वर्षे आहे आणि आतापर्यंत तिने तब्बल १०८ गडकिल्ले सर केले आहेत. अनेक माध्यमांनी तिची दखलही घेतली आहे आणि ‘रायगड भूषण’सारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आले आहे.
 
“मला महाराष्ट्रातले सगळे गडकिल्ले सर करायचे आहेत आणि त्यानंतर देशातील आणि परदेशातील गडकिल्लेही मला सर करायचे आहेत. गडकिल्ल्यांवर चढताना मला भीती वाटत नाही; कारण शिवरायच मला शक्ती देतात. मला गडकिल्ले तर सर करायचेच आहेत आणि मोठे झाल्यावर मला लष्करातसुद्धा भरती व्हायचे आहे,” अशी प्रतिक्रिया शर्विकाने दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली.
‘स्मिहाविष्कार’
 
स्मिहा पाटोळे ही बाल युट्यूबर. ‘स्मिहाविष्कार’ हे तिचे स्वतःचे युट्यूबर चॅनल ती चालवते. मराठीत लहान मुलांसाठी युट्यूब चॅनल्स अनेक आहेत, पण स्वतः लहान मुलांनी लहान मुलांसाठी चालवलेले चॅनल्स अगदी नगण्यच. स्मिहाने ती सुरुवात केली. कोरोना काळातील ‘लॉकडाऊन’च्या काळात स्मिहाने तिच्या पालकांच्या मदतीने ‘स्मिहाविष्कार’ हे युट्यूब चॅनल सुरू केले होते आणि आजवर तिने त्यावर अनेक चांगल्या चांगल्या विषयांवरील व्हिडिओ पोस्ट केले आहेत. स्मिहा तिच्या व्हिडिओमध्ये गाणी म्हणते, कविता म्हणते, गोष्ट सांगते आणि इतरही बरेच कलाप्रकार सादर करते. स्मिहाचा निरागसपणा, तिचा आत्मविश्वास, तिची उत्सुकता आणि तिची अभिव्यक्त होण्याची सुंदर पद्धत, यांमुळे अनेक लोक तिच्या युट्यूब चॅनलसोबत जोडले गेले आहेत. ‘बाल युट्यूबर म्हणून स्मिहा अनेकांच्या पसंतीस उतरली आहे. लहान मुलांना अनेक गोष्टींचे कुतूहल वाटत असते. तसेच कुतूहल स्मिहालासुद्धा वाटते आणि त्या कुतूहलातून निर्माण झालेल्या अनेक गोष्टींचे सादरीकरण स्मिहा तिच्या चॅनलवर करते. स्मिहा पाटोळे हिच्या युट्यूब चॅनलवरील ’स्मिहाविष्कार’चे तिचे व्हिडिओ पाहिल्यावर ’किती वर्षांची आहे स्मिहा?’ असे अनेकजण तिच्या पालकांना विचारतात. अवघ्या सात वर्षांची स्मिहा इतके उत्तम सादरीकरण करते, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते आणि लोक तिचे कौतुक करतात. “मला युट्यूबवर गाणी म्हणायला आणि गोष्टी सांगायला खूप आवडतात. मी माझ्या खेळण्यांसोबतही युट्यूबवर एक व्हिडिओ केला होता. मी माझा अभ्यास सांभाळून माझ्या आईबाबांच्या मदतीने माझे युट्यूब चॅनल चालवते,” अशी प्रतिक्रिया स्मिहाने दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली.
गीत गाती ‘उन्नती’
 
उन्नती मुंढे ही १२ वर्षांची बालगायिका. अगदी लहानपणापासूनच तिला गायनाची आवड. आजोबा गायक असल्यामुळे गायनाचे बाळकडू तिला तिच्या घरातूनच मिळाले होते. नुकत्याच पार पडलेल्या ‘मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद’ या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या दुसर्‍या पर्वात उन्नती सहभागी झाली होती आणि त्या कार्यक्रमातून ती महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचली. “मी गायन आणि माझा अभ्यास दोन्ही व्यवस्थित सांभाळते. गायनकला सांभाळत असताना माझ्या अभ्यासात कोणत्याही अडचणी येत नाहीत. मला गायनात तर करिअर करायचेच आहे, पण सोबत माझा अभ्यास सुद्धा सांभाळायचा आहे,” अशी माहिती उन्नतीने दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.
लक्षवेधी वेद
वेद शेलार हा अवघ्या आठ वर्षांचा. अगदी लहान वयापासूनच त्याला अभिनयाची प्रचंड आवड. त्याची ही आवड त्याला अभिनय क्षेत्रात घेऊनसुद्धा आली. वेदने ‘माय फ्रेंड गोरीला’ आणि ‘चतुर बाल गणेशा’ या बालनाट्यांत देखील काम केले होते. बालनाट्यांसोबत त्याने मालिकाविश्वातही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. वेदने ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ आणि ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या तो ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ या प्रसिद्ध मालिकेत माधवची भूमिका साकारत आहे.
“आपली शाळा आणि अभ्यास सांभाळून वेद त्याची अभिनयकला जोपासतो. शूटिंगवरून घरी यायला कितीही उशीर झाला, तरीही वेद त्याचा गृहपाठ पूर्ण करतो,” अशी माहिती त्याच्या आईने दिली. अभिनय क्षेत्रात नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि साकारण्यासाठी तो कायम प्रयत्नशील असतो. “मला अभिनय करायला खूप आवडतो आणि मला कायम माझी अभिनयकला जोपासायची आहे,” असे तो सांगतो.
दिपाली कानसे
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121