मुंबई, दि.२३: "काँग्रेसच्या मोहब्बतच्या दुकानात महिलांबद्दल व्देष विकला जातो. वारंवार महिलांच्या आत्मसन्मानावर वार करायची तर काँग्रेसची जुनी सवय. नुकताच कराडमध्ये याची प्रचिती आली. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय अजीत चिखलीकर यांनी महिलांबद्दल अश्लाघ्य भाषा वापरत अकलेचे तारे तोडले आहेत", असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावले आहे.
अजित चिखलीकर यांच्यावर निशाणा साधत चित्रा वाघ म्हणाल्या,"चिखलीकर लक्षात ठेवा, माय- माऊलींची साडी चोळी देऊन ओटी भरायची संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्राची, हिंदुंची आणि आपल्या शिवरायांची परंपरा संस्कार आहेत. पण हिंदू संस्कार आणि काँग्रेस यांचा दूरान्वये संबंध नाहीच. त्यामुळे सत्तांध झालेल्या काँग्रेस नेत्यांची महिलांबद्दल वक्तव्य करताना जीभ घसरतेच. गोर-गरीब माय भगिनींना साड्या वाटप केले तर भरसभेत त्या बहिणींबद्दल अश्लाघ्य भाष्य करत बहिणींचा बहिणींच्या परिस्थितीचा अपमान या निर्लज्ज नेत्याने केला. चव्हाणांच्या जवळचा हा अजित चिखलीकर महिलांवर चिखल उडवण्याची कुठलीही संधी सोडत नाही. गोर गरीब कामगार महिलांच्या संसाराला हातभार लावावा म्हणून शासनातर्फे भांडी वाटप योजना राबवली जाते. त्या योजनेची आणि गोरगरीब महिलांची या निलाजऱ्या माणसाने खिल्ली उडवली होती, याची आठवणही चित्रा वाघ यांनी काँग्रेसला करून दिली.
पुढे त्या म्हणाल्या," एकंदरीतच काँग्रेसला बहिणींच सुख पाहवत नाही. लाडकी बहिण योजनेबाबत थेट न्यायालयात जाणारी ही सावत्र भावंड आहेत. आता तर पृथ्वीराज चव्हाणांसमोर बहिणींबद्दल अपमान होतो. लडकी हुँ लड सकती हुँ हा फक्त तुमच्या साठी नारा आहे… तो आम्ही खरा करून दाखवणार तुमच्या विरूध्दची संविधानिक लढाई आम्ही जिंकणार कारण लक्षात ठेवा या प्रत्येक बहिणींच्या मागे त्यांचा देवाभाऊ भक्कमपणे उभा आहे."