डेहराडून : अयोध्येत झालेल्या श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशभरात संपूर्ण वातावरण राममय झाले आहे. याचीच प्रचिती उत्तराखंडमध्ये आली आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी येथील मदरशांमध्ये औरंगजेब नाही तर प्रभू श्रीराम शिकवू असे उघडपणे म्हटले आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या मदरशांमध्ये शिकणारी मुलेही आता भगवान श्रीरामाची कथा वाचतील, अशी माहिती नुकतीच त्यांनी दिली.
शादाब शम्स यावेळी म्हणाले की, "आम्ही आमच्या मुलांना मदरशांमध्ये औरंगजेब शिकवणार नाही तर श्रीराम शिकवू. आपण भारतीय आहोत. श्रीरामाचे चरित्र असे आहे की लोक त्याचे पालन करतात. कोणत्याही पित्याला श्रीरामासारखे मूल हवे असते, जो आपल्या वडिलांसाठी वनवास भोगायलाही तयार होईल. जो निश्चितच आपल्या वडिलांचे वचन पाळेल."
पुढे लक्ष्मणाचा उल्लेख करत ते म्हणाले, "आपला भाऊ वनवासात चालला आहे म्हणून सर्व गोष्टींचा त्याग करणारा लक्ष्मणासारखा धाकटा भाऊ आपल्याला हवा आहे, की सत्तेसाठी भावाचाच शिरच्छेद करणारा औरंगजेबासारखा भाऊ हवा आहे? हे ठरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही औरंगजेबाला शिकवणार नाही." दरम्यान शादाब शम्स यांनीही आपला डीएनए प्रभू रामाशी जुळत असल्याचेही मान्य केले. तसेच मार्चपासून यासंदर्भात नवीन अभ्यासक्रम लागू होईल असेही ते म्हणाले.
उत्तराखंड वक्फ बोर्डार्चे चेअरमन शादाब शम्स यांनी मदरशांमध्ये श्रीरामाचे धडे शिकविण्याबद्दल दिलेले वक्तव्य अत्यंत स्वागतार्ह आहे. कोणत्याही देशामध्ये उपासना पद्धती भिन्न असली तरी संस्कृती आणि राष्ट्रपुरुष हे समान असतात. तसे ते असायला हवेत आणि त्यांच्याबद्दल समान आदरभाव प्रत्येक नागरिकांमध्ये असला पाहिजे. शादाब शम्स भारतीयांच्या मनातील हे सूत्र लक्षात घेऊन जर मदरशांमध्ये श्रीरामाचा पाठ विद्यार्थ्यांना शिकवणार असतील तर त्यामुळे आपल्या देशात सौहार्दाचे नवीन पर्व सुरू होईल. प्रत्येक भारतीय त्यांचे स्वागत करील. यानिमित्ताने सर्व मुस्लिम नेत्यांना मी हे सांगू इच्छितो की त्यांनी शादाब शम्स यांच्या पावलावर पाऊल ठेवत हिंदूंची पवित्र देवस्थाने हिंदूंना परत करण्याचा सामुहीक निर्णय घ्यावा आणि भारतीय मुस्लिम मानसिकतेचा नवा आदर्श प्रस्तुत करावा.- मोहन सालेकर, मंत्री, कोकण प्रांत विहिंप