अभिराम भडकमकर यांची कणखर, प्रगल्भ ‘सीता‘

    20-Jan-2024
Total Views |
abhijeet bhadkamkar
 
एखाद्या निवडलेल्या विषयाचा बहुपैलू वेध घेणारे आणि अनेक आयामांतून त्या विषयाचा एक एक पदर अलगद उलगडून सांगणारे लेखक आणि नाटककार म्हणजे अभिराम भडकमकर. त्यांच्या ’सीता’ या नव्या कोर्‍या कादंबरीचे नुकतेच प्रकाशन झाले. तसेच उद्या, दि. 22 जानेवारी रोजी रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळाही अयोध्येत मोठ्या उत्साहात संपन्न होईल.त्या पार्श्वभूमीवर रामराज्यातील सीतेचे भावविश्व आणि तिची निर्णयक्षमता व भूमिका घेण्याची वृत्ती, यावर ही कादंबरी प्रकाश टाकते. तेव्हा या कादंबरीविषयी, एकूणच सीतेच्या व्यक्तिरेखेविषयी अभिराम भडकमकर यांच्याशी केलेली ही खास बातचीत...
 
रामायणावर बरीच साहित्य निर्मिती झाली, त्यातल्या एका एका व्यक्तिरेखेचाही अनेकांनी वेध घेतला. मग तुम्ही शब्दांकित केलेली सीता कशी वेगळी आहे? 
 
रामायण आपल्या कानावर अगदी लहानपणापासूनच येतं. ते कथेच्याही आधी ‘गीतरामायणा’तून माझ्यापर्यंत पोहोचलं आणि त्याचबरोबर मैथिली शरण गुप्तांचे ‘साकेत’ मी ऐकले होते. मोरारजी बापू हरियाना यांच्या दहा दिवसांच्या रामकथाही ऐकल्या. असं रामायण विविध बाजूने माझ्यापर्यंत पोहोचत होतं. मधल्या काळात सीता अबला, अगतिक असा आपला समाज झाला होता. पण, तरी त्या काळातील स्त्रीचित्राला छेद देणार्‍या गार्गी मैत्रेयी दिसल्या. रणांगणावर जाणारी कैकयी, वनवासाला जाणारी रामप्रिया, हा निर्णय सीतेचा होता. तिला जे प्रशिक्षण दिले होते - नैतिकता, राजकीय, संस्कृती, धर्म या सर्वांतून ती भूमिका आणि त्यायोगे निर्णय घेऊ शकते. ब्रह्मवादिनी गार्गी तर सीतेच्या गुरू होत्या. त्यात उत्तरकांड प्रक्षिप्त आहे, असे म्हटले जाते. रामाचे सुरुवातीचे विशेष उत्तरकांडात नाहीत. ते नंतर जोडले असावे. याचाही उल्लेख कादंबरीत केला आहे. सीता स्वतःचा निर्णय केवळ रामालाच सांगत नाही, तर कैकेयीला सांगते. कैकेयीला समजून घेणारी ही सीता आहे. या कादंबरीत ’नियती की कर्म’ हा सीतेसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न केवळ माझा नाही, तर माता अहिल्या, कैकेयी यांचासुद्धा आहे. त्यांचा उलगडा करणारी ही सीता!
 
तुमचं लेखन असो अथवा नाटक, तुमची कोणतीही निर्मिती ही ठरवून केलेली वाटत नाही, ती एक उत्कट अभिव्यक्ती असते. काही तरी वाटलेलं असतं, काही मांडायचं असतं. तुमची सीता नेमकं असं काय सांगते? या सीतेने तुम्हाला काय दिले?
 
एखादा विषय लिहून हातावेगळे केला की, एक पोकळी निर्माण होते, हे खरंय. असं वाटतं की, आपल्याला काही सांगायचे होते ते संपलंय. पण, लिहिताना माझ्या लक्षात आले की, हे केवळ राम-रावण युद्ध नाही. सीतेला पळवल्यामुळे रामायण घडले नाही, तर हा एक संस्कृती संघर्ष आहे. एक त्यागाचेच रूप आहे, तर एक भोगवादाचे. त्यातून सीता आपल्याला उलगडता येते. एका परिसंस्थेविरुद्ध लढणार्‍या सीतेचा हा संघर्ष आहे. आपल्याकडे प्रत्येक पात्राला विविध पदर आहेत. व्यक्ती प्रवृत्तीचा संघर्ष आहे आणि तो उत्कटपणे मांडणारे लेखकही आहेत. हे सर्वच इतकं लोकविलक्षण आहे की, आपल्याला ते आपल्या अलीकडचे-पलीकडचे वाटते.
 
मग आजवर अशा दृष्टिकोनातून सीतेला कुणी त्यांच्या कलाकृतींमधून का मांडले नसावे? तुम्हालाही या व्यक्तिरेखेविषयी कादंबरी लिहावी, असे का वाटले?
 
माझ्याबाबत म्हणशील तर मी आता ‘कोविड’च्या काळात वाल्मिकी रामायण वाचले, त्याचवेळी मला ही सीता सापडली. तोवर मी तिचा विचार केला नव्हता आणि इतर कुणी ती का मांडली नसावी, याबाबत माझं मत असं आहे. आपण पुन्हा आपल्या मुळांपाशी जातोय, हा त्याचाच पुरावा! मध्यंतरीच्या काळात आपल्यावर परकीय आक्रमणे झाली आणि आपल्यावर अन्यायच झाला आणि समाजात अन्यायच आहे, अशी आपली विचारसरणी होऊ लागली होती. एका मोठ्या सामाजिक स्थित्यंतरानंतर आपण पुन्हा आपल्या संस्कृतीशी नाळ साधू पाहतोय. आपण सीतेला लिहिताना आपले विचार तिच्या वागण्यावर लादत नाहीत ना? किंवा तिचा स्वभाव माझी मतं बदलत नाही ना, हा लेखकाचा संघर्ष या कादंबरीत दिसून येतोय.
 
दुसरं असं की, ‘अ‍ॅट एनी कॉस्ट’ आणि ‘बालगंधर्व’, पुढे ‘इन्शाअल्लाह’ या तुमच्या साहित्यकृतींचे विषय कमालीचे भिन्न आहेत. पण, तरीही या सर्व कादंबर्‍या जीवनवादी आहेत. तेव्हा मग साहित्यसंचात ‘सीता’ कशी बसते? दि. 22 जानेवारीला होणार्‍या अयोध्येतील रामलला प्रतिष्ठापनेनिमित्त ‘सीता’ साकारण्याची प्रेरणा मिळाली का?
 
खरं तर इतक्या कमी वेळात मला संपूर्ण कादंबरी लिहिता आली असती, तर ते किती छान झालं असतं. परंतु, ही कादंबरी मी पूर्वीच लिहायला घेतली होती. मला जाणवले की, आपण अजूनही सीतेकडे अबला म्हणून पाहतोय. हा आपला दृष्टिकोन मला छळू लागला आणि मी ठरवले, मला जी सीता दिसते, ती आता मांडायची! दुसरं असं की रामराज्य, रामराज्य म्हणजे काय? देव, असुर आणि मानवांचे उल्लेख यात आहेत. परंतु, यातले श्रेष्ठ-कनिष्ठ असे कुणी नाहीत. अनुसूयेसारखी स्त्रीसुद्धा देवांना लहान मुलांच्या रुपात बंदी बनवून, आपल्या अंगणात खेळवते. यात समत्वाचा विचार आहे. आपल्याला मानवातील पशुत्व आणि असुरातील असुरत्व नष्ट करायचे आहे. असुर किंवा मानव नष्ट करायचे नाहीत. त्रिजटेसारखी असुर स्त्री सीतेची सखी होती. पण, तिच्यात असुरत्व नव्हतं, हे या विषयातलं वेगळेपण!
 
नाटक हा तुमच्या साहित्यनिर्मितीचा गाभा. तेव्हा सीतेचा विषय नाटकातून न घेता, कादंबरी स्वरुपात का मांडवासा वाटला?
 
कादंबरी लिहिताना तुम्हाला मनमुराद स्वातंत्र्य अनुभवता येतं. मोठा पट मांडता येतो. हवी तेवढी पात्रं आणता येतात. नाटकाची बलस्थाने वेगळी आहे. हा मोठा पट मांडत असताना, कादंबरी मला या विषयासाठी साजेशी वाटली. अनेक स्थळं, मोठा काळ कितीही, केवढाही आपण तिच्यात अंतर्भूत करू शकतो. नाटकासाठी या सर्वांना मर्यादा येतात. पण, तरीही प्रकाशनानंतर दोन दिवसांत मला काही फोन आले की, तुम्ही आम्हाला याचे एकपात्री किंवा नाट्यरुपांतर करून द्याल का? म्हणजे यात नाट्यमयता आहे. ही मांडणी मला या निवेदनातून मांडता आली.
 
‘सीता’ या कादंबरीचे प्रकाशन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने केले. तेव्हा त्यामागचं नेमकं कारण काय?
 
माझा एक विचार होता की, सोशल मीडिया हे एक नवे माध्यम असून, ते आज मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. सोशल मीडिया ही ताकद आहे, आजच्या युगाची. तेव्हा प्रत्येकाला आपल्या सोयीप्रमाणे पुस्तक प्रकाशन सोहळा पाहाता यावा किंवा ऐकता यावा, म्हणून मी ऑनलाईन माध्यमाची निवड केली.
 
आतापर्यंत ‘सीता’ या कादंबरीला मिळालेला वाचकांचा प्रतिसाद, अभिप्राय याविषयी काय सांगाल?
 
‘सीता’ या कादंबरीला वाचकांचा प्राप्त झालेला प्रतिसाद दोन प्रकारचा आहे. काही लोकांना वाटते की, या कादंबरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा तेच आता उगाळले जाणार का, तीच सीता, तेच वनवास गमन, तेच युद्ध. त्यात वेगळेपण ते काय? असं मांडणारा एक गट आहे आणि दुसरा म्हणजे अगदी भक्तिभावाने तिच्याकडे पाहणारा गट. पण, काहींनी या दोन्ही बाजूंनी विचार केला आहे आणि एका वेगळ्या दृष्टिकोनापेक्षा पाटी कोरी करून हे पुस्तक वाचायला घेतले आहे, याचा मला जास्त आनंद होते. पुरुषोत्तम बेर्डे यांनीसुद्धा यावर एक पोस्ट लिहिली होती.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.