‘कोरोना’चे पाप चीनचेच!

    19-Jan-2024
Total Views |

corona china

चीनने ‘कोरोना’ पसरवण्याचे पाप करून, संपूर्ण जगाला ‘कोरोना’च्या विळख्यात ढकलले, हे तर आता जगजाहीर. नुकत्याच अमेरिकन काँग्रेसच्या शोधकर्त्यांनी चीनचे पितळ उघडे पाडले. या शोधकर्त्यांच्या अहवालानुसार, ‘कोरोना’ पसरवण्यात चीनचा मोठा हातभार असल्याचे समोर आले आहे. अमेरिकन काँग्रेसच्या शोधकर्त्यांच्या अहवालानुसार, चिनी संशोधकांनी डिसेंबर २०१९च्या अखेरीस ‘कोरोना’ला कारणीभूत असलेल्या विषाणूचे मॅपिंग केले. कमीतकमी दोन आठवड्यांपूर्वी ’जागतिक आरोग्य संघटने’ने संसर्गजन्य विषाणूमुळे उद्भवलेल्या धोक्याचे प्रमाण कमी केले होते. ज्याचे रुपांतर नंतर महामारीत झाले. अमेरिकन काँग्रेसच्या शोधकर्त्यांनी केलेल्या तपासणीनुसार, चिनी संशोधकांनी दि. २८ डिसेंबर, २०१९ रोजी विषाणू वेगळे केले. व्हायरसच्या सुरुवातीच्या काही महत्त्वपूर्ण दिवसांमध्ये चीनला साथीच्या रोगाबद्दल माहीत होते. साथीचा रोग चीनमधील फक्त काही भागांत पसरला आहे, याची चीनला पूर्ण कल्पना होती. मात्र, तरीही चीनने ती गोष्ट लपवून ठेवली आणि ’कोरोना’सारख्या महाभयंकर महामारीला आमंत्रण दिले. डिसेंबर अखेरीस चीनने इतकी मोठी गोष्ट लपवली आणि त्यानंतर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जगभरातील नागरिक त्या ठिकाणी आनंदोत्सवात सामीलही झाले. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या माध्यमातून हा विषाणू जगभर पसरला आणि २१व्या शतकातील आतापर्यंतचा सर्वात विनाशकारी विषाणू अर्थात ’कोरोना’ने जगभरात धुमाकूळ घातला.
 
अतिरिक्त दोन आठवडे जागतिक वैद्यकीय समुदायाला ’कोरोना’मुळे उद्भवलेल्या धोक्याची खात्री करण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले असते. ’कोरोना’ पसरण्याच्या अगदी प्रारंभीच्या काळात जगभरातील शास्त्रज्ञ ’कोविड-१९’ नावाच्या आजाराला समजून घेण्यासाठी धावत होते. मात्र, त्यावर तत्काळ शक्य होतील, त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे जगभरातील लाखो लोकांचा बळी गेला, कोट्यवधी लोक कोरोनाबाधित झाले. याचबरोबर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्या. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मधील एका अहवालानुसार, बीजिंगमधील एका चिनी संशोधकाने दि. २८ डिसेंबर, २०१९ रोजी अमेरिकन सरकार संचालित डाटाबेसमध्ये व्हायरसच्या संरचनेचा जवळजवळ संपूर्ण क्रम सादर केला. ’युएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’ने त्याच्या प्रोटोकॉलचे अनुसरण केल्यानंतर, चिनी संशोधकाला अधिक तांत्रिक तपशील विचारल्यानंतर, हा क्रम कधीही प्रकाशित झाला नाही आणि दि. १६ जानेवारी २०२० रोजी डाटाबेसमधून हटविला गेला.
 
दि. १२ जानेवारी, २०२० रोजी ’एनआयएच’ने दुसर्‍या स्रोताकडून ’सार्स-२’ क्रम प्राप्त झाला आणि तो प्रकाशित करण्यात आला. चीनने दि. ११ जानेवारी २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेसोबत ’कोविड’ विषाणूचा क्रम सामायिक केला. जेव्हा चिनी शास्त्रज्ञाने ‘कोविड’ क्रम सादर केला, तेव्हा मात्र वुहानमधील अधिकारी ‘कोरोना’ विषाणूला केवळ ‘अज्ञात कारणाचा न्यूमोनिया’ म्हणून ओळखत समजत होते. सुरुवातीच्या काळात सर्वाधिक ’कोविड’ उद्रेक असलेल्या, वुहानमधील हुआनान सीफूड होलसेल मार्केटदेखील चिनी लोकांनी बंद केले नव्हते. कोणतीही पूर्व काळजी न घेता चीन सरकार आणि चिनी नागरिकांनी ‘कोरोना’ला हलक्यात घेतले. चीनच्या या नाकर्तेपणाचा आणि निष्काळजीपणाचा फटका मात्र संपूर्ण जगाला बसला. याचाच परिणाम म्हणजे चीनमधील घसरती लोकसंख्या. चीनच्या लोकसंख्येत २०२३ मध्ये दोन दशलक्ष लोकांची घट झाली असून ’कोविड-१९’ निर्बंध उठवल्यानंतर मृत्यू दरातही मोठी वाढ झाली. मृतांची संख्या दुप्पट होऊन ६ लाख, ९० हजारांवर पोहोचली. जन्मदरात २०२३ मध्ये ५ लाख, ४० हजारांनी घट झाली. २०२३ मध्ये सुमारे ऩऊ दशलक्ष बाळांचा जन्म झाला, ज्याचे प्रमाण २०१६च्या तुलनेत निम्मे आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये चीनमधील ’कोविड’ निर्बंध अचानक उठवल्यामुळे, डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत या कालावधीत सुमारे ८० हजार चिनी नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या याहून अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर आणि लोकसंख्य घटली तरी चिनी ड्रॅगन सुधारण्याची शक्यता शून्यच!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.