मुंबईत २० ते २३ जानेवारीदरम्यान भव्य श्रीराम आनंद सोहळा!

भाजपचे आयोजन; गीत रामायणाच्या स्वरांनी मुंबईकर मंत्रमुग्ध होणार

    16-Jan-2024
Total Views | 65

Mumbai BJP

मुंबई :
अयोध्येत श्रीरामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाच्या वतीने २० ते २३ जानेवारीदरम्यान श्रीराम आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून श्रेष्ठ कवी गदिमा यांचे शब्द आणि बाबुजी अर्थात सुधीर फडके यांचे अद्वितीय संगीत आणि मधूर आवाज असलेली गीत रामायणातील गाणी नामांकित गायकांकडून ऐकण्याची सुवर्णसंधी मुंबईकरांना मिळणार आहे.
 
हा कार्यक्रम २० ते २३ जानेवारी या कालावधीत मुंबईत चार ठिकाणी होणार आहे. याशिवाय मुंबईत ठिकठिकाणी प्रत्येक विभागात महाआरती, देवळांची साफसफाई, रोषणाई, विविध धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिली. कार्यक्रमाचे संयोजन जीवन गाणी, तर संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे असणार आहे. गायक ऋषिकेश रानडे, निनाद आजगावकर, अभिषेक नलावडे, सोनाली कर्णिक, केतकी भावे - जोशी यांचे गीत सादरीकरण, डॉ. संजय उपाध्ये यांचे निवेदन, तर सोनिया परचुरे आणि ग्रुपचे नृत्य सादरीकरण होणार आहे. मोफत प्रवेशिका दोन व्यक्तींसाठी देण्यात येणार असून, कार्यक्रमादिवशी तिकीट खिडकीवर आसन क्रमांक देऊन नाट्यगृहात प्रवेश दिला जाईल. बुधवार, दि. १७ जानेवारीपासून प्रवेशिका नाट्यगृहात उपलब्ध करून देण्यात येतील.
 
असे होतील कार्यक्रम
 
शनिवार २० जाने. रात्री ८.३० वा. दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व)
रविवार २१ जाने. सायं. ६.३० वा. साहित्य संघ मंदिर, गिरगाव
सोमवार, २२ जाने. सायं. ६.३० वा. रंगशारदा, वांद्रे (प.)
मंगळवार, २३ जाने. रात्री ८.३० वा. यशवंत नाट्यगृह, माटुंगा
 
महाराष्ट्रातील संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा
 
या निमित्ताने महाराष्ट्रातील संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. अक्लकोट येथून स्वामी समर्थाच्या, शिर्डीतून साई बाबांच्या, सज्जनगडावरुन रामदास स्वामी आणि शिमोगा येथून श्रीधर स्वामी, तसेच शेगाव येथून गजानन महाराजांच्या पादूका मुंबईत दर्शनासाठी आणण्यात येणार आहेत. मंगळवार, दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ८.३० ते रात्री ९.३० पर्यंत अंधेरी येथील सिम्फनी बँक्वेट, विजयनगर सोसायटीत या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121