मुंबई : आज दहीहंडीच्या निमित्ताने राज्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे. ठाणे, मुंबई सह उपनगरात अनेक ठिकाणी गोपाळांचा 'बोल बजरंग बली की जय' असा एकच जोश दिसून येतोय. तसेच आज वरुणराजाने उत्सवाला हजेरी लाऊन गोपाळांचा उत्साह अजून वाढवला आहे.
'भारतातील सर्वात मोठी दहीहंडी' म्हणून प्रसिद्ध असलेली राम कदम यांनी आयोजित केलेली घाटकोपर पश्चिम येथील दहीहंडीला गेल्या अनेक वर्षापासून ठाणे, मुंबई आणि उपनगरातील अनेक गोविंदा पथक मोठ्या उत्साहाने येथे हजेरी लावतात. यावर्षीच्या या उत्सवाची सुरुवात सावन मित्र मंडळाने यशस्वी सहा थर लाऊन केली. यानंतर बाळ शिव सम्राट गोविंद पथक, नरवीर तानाजी व्यायाम मंदिर (घाटकोपर), पंचवटी गोविंद पथक (घाटकोपर), श्री राधे कृष्ण गोविंद पथक (बोरिवली) अशा वेगवेगळ्या गोविंदा पथकांनी महिनाभर केलेल्या सरवाचे प्रात्यक्षिक दाखवले.
यापैकी काही मंडळे अनेक वर्षापासून इथे येतात. त्यापैकी बाळ शिवाजी गोविंदा पथक (मालाड) हे एक आहे. गेल्या १६ वर्षापासून ते राम कदम यांच्या दहीहंडीमध्ये उत्साहाने उपस्थित असतात. "दरवर्षी आम्ही उत्साहाने आवर्जून इथे येतो आणि पहिली सुरुवात इथेच करतो," असे या पथकाच्या एका गोविंदाने सांगितले. तसेच क्रांती गोविंदा पथकाने सुरुवातीला पाच थर लाऊन राष्ट्रगीत गायिले. आणि पुन्हा एकदा शिस्तीने आठ थर लाऊन आपला मनोरा सादर केला. अशाप्रकारे अनेक गोविंदा पथकांनी उत्कृष्टरीतीने दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला.