मुंबई : मुंबईकरांची जुनी ओळख असणाऱ्या बेस्टच्या ताफ्यातील एका दुमजली बसगाडीचे जतन करण्यात येणार आहे. विना वातानुकूलित दुमजली बस गाड्यांची सेवेतील १५ वर्ष पूर्ण झाल्याने शासन निर्णयाप्रमाणे या गाड्या सेवेतून बाहेर काढण्यात आल्या आहेत. तरीसुद्धा मुंबईकरांकरिता त्यांच्या आठवणीतील भाग म्हणून एक दुमजली वातानुकूलित बसगाडी बेस्ट उपक्रमाच्या आणिक आगार येथील संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.
ही बसगाडी उभी करण्याकरिता रीतसर शेड, प्लॅटफॉर्म, आदी गोष्टींची पूर्तता करण्यात येत असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे. लाल रंग, मार्ग दर्शविणारे ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फलक अशी विविध वैशिष्ट्य असलेल्या बेस्टच्या जुन्या डबल डेकर बसचे जतन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ८ डिसेंबर १९३७ मध्ये पहिली दुमजली बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली होती. तर १५ सप्टेंबर २०२३ रोजी तिची शेवटची फेरी झाली.