लोकाभिमुख आणि कार्यक्षम प्रशासनासाठी डिजीटल तंत्रज्ञान महत्त्वाचे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
19-Aug-2023
Total Views | 48
नवी दिल्ली : प्रशासनामध्ये परिवर्तन करण्यासाठी आणि ते अधिक कार्यक्षम, समावेशक, वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी देशात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथे आयोजित जी २० डिजिटल अर्थव्यवस्था मंत्र्यांच्या बैठकीला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, डिजिटल अर्थव्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी बंगळुरूपेक्षा उत्तम दुसरी जागा नाही. नवोन्मेषावरील अतूट विश्वास आणि वेगवान अंमलबजावणीप्रति वचनबद्धतेने भारताच्या डिजिटल परिवर्तनाला बळ दिले आहे. प्रशासनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि ते अधिक कार्यक्षम, सर्वसमावेशक, जलद आणि पारदर्शक बनवण्यासाठी देशात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जात आहे. भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत व्यवस्था जागतिक आव्हानांसाठी मोठ्या प्रमाणात, सुरक्षित आणि सर्वसमावेशक उपाय उपलब्ध करून देते. त्यामुळे भारत ही संशोधनासाठी एक आदर्श प्रयोगशाळा ठरत आहे. भारतात यशस्वी होणारे हे संशोधन जगात कुठेही सहज वापरता येऊ शकते, असेही पंतप्रधान म्हणाले.
तंत्रज्ञानाने आपल्याला परस्परांशी जोडले असून सर्वांसाठी समावेशक आणि शाश्वत विकासाचे वचन कायम राखले आहे असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, जी 20 राष्ट्रांना सर्वसमावेशक, समृद्ध आणि सुरक्षित जागतिक डिजिटल भविष्याचा पाया रचण्याची वैशिष्ट्यपूर्ण संधी आहे यावर भर दिला. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आर्थिक समावेशकता आणि उत्पादकता यांना गती देता येऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
शेतकरी आणि लहान व्यवसायांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापर करण्याला प्रोत्साहन देणे, जागतिक डिजिटल आरोग्य परिसंस्था उभारण्यासाठी तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सुरक्षित आणि जबाबदार वापरासाठी एक आराखडा विकसित करण्याची सूचना त्यांनी केली. मानवतेला भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञान-आधारित उपायांची संपूर्ण परिसंस्था उभारली जाऊ शकते, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.