मुंबई : अभिनेता अक्षय कुमार अभिनित ‘ओएमजी २’ या चित्रपटावर घोषणेपासूनच संक्रात आली होती. हिंदू धर्माचा अवमान या चित्रपटातून केला जाईल अशी शंका असणाऱ्या ‘ओएमजी २’ चित्रपटाला अनेक अडचणींचा सामना प्रदर्शनापर्यंत करावा लागला होता. परंतु, या सर्व अडचणींतून मार्ग काढत अनपेक्षितपणे ‘ओएमजी २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. दरम्यान, या चित्रपटाबद्दल अनेकांनी आपली मते समाज माध्यमावर मांडली असताना आता अभिनेते शरद पोंक्षे यांनीही या चित्रपटाबद्दल आपले मत सांगितले आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षें यांनी नुकताच अक्षयचा ‘ओएमजी २’ चित्रपट पाहिला आणि चित्रपट पाहिल्यानंतर ते पोस्ट करण्यापासून स्वत:ला रोखू शकलेले नाही. “प्रत्येकानं अवश्य पहावा असा सिनेमा”, असे शरद पोंक्षेंनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे. त्यावरही त्यांनी कमेंट केली आहे.
शरद पोंक्षे हे त्यांच्या वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत असतात. आता त्यांनी अक्षयच्या ‘ओएमजी २’ चित्रपटाला पाठिंबा देण्यावरुन या पोस्टवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटकरी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत आहेत. कमेंटमध्ये अनेकांनी चित्रपटाला पाठिंबा दिला आहे तर काहींनी चित्रपटाचा विरोध केला आहे.
शरद पोंक्षे यांच्या या पोस्टवर एकाने कमेंट करत असं म्हटले आहे, “सनातनी असल्याचा अभिमान आहे…या चित्रपटातून जो विषय मांडला आहे तो खरच खूप गंभीर आणि महत्त्वाचा आहे.. आणि असा विषय मांण्यासाठी फक्त आणि फक्त हिंदू धर्माचा, ग्रंथाचा असारा घेतला कारण सनातन धर्म प्राचीन तर आहेच पण प्रत्येक बाबतीत परिपूर्ण आहे.. हा गंभीर विषय मांडताना इतर धर्माचा कुठेच आधार नाही घेतला जस omg घेतला होता”, असे त्या नेटकऱ्याने म्हटले आहे. त्यावर शरद पोंक्षेंनी “अगदी बरोबर” असे म्हटले आहे. दरम्यान या चित्रपटाच लैंगिक शिक्षणाचे महत्त्व अतिशय सोप्या पद्धतिने सांगण्यात आले आहे.