केशवसृष्टी कृषी संशोधन संस्था १९८४ साली स्थापना झालेली नोंदणीकृत ‘धर्मादाय’ संस्था असून कृषी व कृषि पूरक व्यवसायाचे शिक्षण, प्रशिक्षण व प्रसार या क्षेत्रात कार्यरत आहे. कृषी शिक्षण आणि कौशल्य विकास उत्तन कृषीचा एकच ध्यास म्हणजेच कृषी शिक्षण आणि कौशल्य विकास... या ध्येयासाठी संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल या लेखात घेतलेला हा मागोवा...
कृषी क्षेत्रात तरुण पिढीची रुची वाढावी, यासाठी ‘केशवसृष्टी कृषी संशोधन संस्था’ ग्रामविकासाचे उल्लेखनीय कार्य करते. मनुष्य आणि नैसर्गिक साधनांचा योग्य वापर करून शाश्वत शेती आधारित उत्पादने घेणे आणि त्यातून व्यापारक्षम शेतीचे मॉडेल तयार करणे आणि शेतकर्यांना स्वावलंबी बनविणे हे संस्थेचे मुख्य उद्देश आहे. कृषी, फलोत्पादन क्षेत्रात उत्पादन वाढ, मृद आणि जल संधारणासोबत पर्यावरण संवर्धन करून शेतीव्यवसायातून स्वयंपूर्णतेसह आर्थिक उन्नती साधणे या निर्धाराने संस्थेची वाटचाल सुरू आहे. शेतकरी कुटुंबातील मुलांना प्रगतीशील शेतकरी बनवण्यासाठी, त्यांना कृषी शाखेचे अद्ययावत आणि शास्रोक्त ज्ञान मिळावे, यासाठी २००५ पासून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली,जि. रत्नागिरी यांच्या मान्यतेने दोन वर्षांचा कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम संस्थेच्या केशवसृष्टी कृषी तंत्र विद्यालयामार्फत रावबिण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना पुरेशी प्रात्याक्षिके करण्याची संधी देऊन कार्यानुभवासह परिपूर्ण ज्ञान दिले जाते. दहावी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी या कृषी शिक्षणक्रमाद्वारे पदविका अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर सरकारी किंवा खासगी नोकरी आणि स्वयंरोजगार, शेती व शेती पूरक व्यवसाय करू शकतात. कुशल प्राध्यापक वर्ग, कर्तव्य दक्ष व्यवस्थापन समिती आणि निष्णांत सल्लागार समिती या तीन समित्या कृषी तंत्र विद्यालयाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. विद्यापीठाच्या मूल्यांकनामध्ये केशवसृष्टी कृषी तंत्र विद्यालयास कायम ‘अ’ दर्जा प्राप्त विद्यालय राहिले आहे. ठाणे आणि पालघरमधील विद्यार्थी प्रामुख्याने येथे प्रवेशित होतात. आमच्या येथे कृषी शिक्षणात विद्यापीठाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अनेक बाबींचा समावेश केला आहे. ज्याने विद्यार्थ्यांच सर्वांगीण विकास होऊ शकतो. विद्यालयाच्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने आणि परिपाठाने होते. श्रमप्रतिष्ठा, बंधुभाव आणि देशप्रेम जागृत करणारी २० गीते त्यांना दोन वर्षांत शिकवली जातात. त्यानंतर दिन विशेष, बोधकथा, ठळक बातम्या आणि सुविचार यांचे प्रस्तुतीकरण प्रतिदिन एक विद्यार्थी याप्रमाणे शालेय क्रमाने करतात. यामुळे त्यांचे सामान्य ज्ञान, सभाधीटपणा आणि आत्मविश्वास वाढतो.
वसतिगृहात राहत असल्याने विद्यार्थी घरापासून दूर असतात; त्यांना घरगुती वातावरण मिळण्यासाठी वसतिगृहात कृषी सप्ताह, गुरुपौर्णिमा, नागपंचमी, रक्षाबंधन, बैलपोळा, गोपाळकाला, स्वातंत्र दिन, आषाढी एकादशी, गणेश चथुर्दशी, आदिवासी दिन, गांधी जयंती, नवरात्री, कोजागिरी पौर्णिमा, विजयादशमी,गोपाष्टमी, संविधान दिन, दत्तजयंती, सावित्री बाई आणि महात्मा फुले जयंती, केशवसृष्टी महापूजा, मकरसंक्रांत, प्रजासत्ताक दिन, महाशिवरात्र, राजमाता जिजाऊ जयंती, विवेकानंद जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, रंगपंचमी, डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर जयंती यासारखे सण आणि उत्सव साजरे केले जातात. तसेच, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि क्रीडागुणांना वाव मिळावा. वार्षिक क्रीडा महोत्सव, वार्षिक स्नेहसंमेलन याचे आयोजन केले जाते. वर्षातून दोन वेळा शैक्षणिक सहल आयोजित केली जाते.
वर्षाला चार कृषी तज्ज्ञांचे विशेष व्याख्यान होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना ‘सॉफ्ट स्किल’चे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या उपजीविका प्रशिक्षणासाठी विविध अल्प मुदतीचे अभ्यासक्रम राबविले जातात. उदा. शिवणकाम, प्लंबिंग, इलेक्ट्रिक आणि वेल्डिंग. होतकरू विद्यार्थ्यांना कृषी विद्यालयात अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून सहा महिने ‘स्टायपेंड’वर काम करता येते. जुन्या विद्यार्थ्यांना नवीन तंत्र शिकवण्यासाठी ‘सीईपी- कंटिन्युअस एज्युुकेशन प्रोग्राम’ जसे हायड्रोपोनिक, बुश पेपर लागवड राबविले जातात. २००५ ते आजपर्यंत एकूण ८९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून त्यापैकी ८३७ माजी विद्यार्थी आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या ४५ टक्के मुली आहेत. विद्यार्थिंनीच्या या उत्साहवर्धक संख्येवरून महिला शेतीत अधिक रस घेत असल्याचे दिसून येते.
आज केशवसृष्टी कृषी तंत्र विद्यालयाचे पदविकाधारक यशस्वी शेतकरी, कृषी व्यावसायिक, कृषिआधारित उद्योगांचे मालक म्हणून समाजात कार्यरत आहेत. यातील काही जण शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात, कृषी साहाय्यक, कृषी सेवक, ग्रामसेवक, तलाठी ही पदे भूषवत आहेत. यातील काही जण महापालिकांमध्ये उद्यानविद्या व वृक्षप्राधिकरण विभागात कार्यरत आहेत. काही जण सार्वजनिक क्षेत्रात कृषी उद्योगात कामे करीत आहेत. काही जण बागायतदार, कृषी सल्लागार आणि कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज यापैकीच तीन माजी विद्यार्थी केशवसृष्टी कृषी विद्यालयात कृषी साहाय्यक म्हणून काम करत आहेत. ‘केशवसृष्टी ग्रामविकास योजने’साठी आमच्यासोबत काम करत आहेत.
केशवसृष्टी कृषी तंत्र विद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी विद्यालयाशी चांगल्याप्रकारे जोडलेले आहेत. माजी विद्यार्थ्यांचा संघदेखील निर्माण करण्यात आला आहे. ते दरवर्षी केशवसृष्टी महापूजा आणि माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी विद्यालयात येतात आणि कृषी विद्यालयातील शिक्षक संस्थाचालकांसह वर्षातून एकदा दिवाळी भेट कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी भेटायला जातात. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी ही एकमेव संस्था असावी. २०१६ साली केशवसृष्टी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनासोबत घेऊन ‘केशवसृष्टी’ संस्थेने ग्राम विकासाचे काम सुरू केले आहे. संस्था आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि कृषी या चार प्रमुख शाखेत, पाच विभागातील २० संकुलातील, १७५ गावात अनेक शेतकर्यांसोबत काम करत आहे. बांबू हब, वृक्षारोपण, आत्मनिर्भर अन्नदाता, उत्कर्ष वाटिका, जलकुंभ, आदर्श गाव हे यातील काही प्रमुख उपक्रम आहेत.
डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठानेदेखील आमच्या कार्याची दाखल घेत कृषी विद्यालयास ‘अ’ दर्जा दिला आहे आणि ९४.५ टक्के गुण मिळवून कोकणातील सर्वोत्कृष्ट कृषी विद्यालय असा बहुमानदेखील मिळाला आहे. तसेच, विद्यालयास दुसरी तुकडीसुद्धा मिळाली आहे. केशवसृष्टी कृषी तंत्र विद्यालयाची सर्वसमावेशक नवीन वास्तू उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विद्यालयाचे सर्व घटक एका छताखाली येऊन अजून चांगले प्रशिक्षण देता येईल. केशवसृष्टी कृषी तंत्र विद्यालयात भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन प्राचार्या अनघा मांडवकर यांनी केले आहे.
अनघा मांडवकर
९९२००७८४८४
प्राचार्या, केशवसृष्टी कृषी तंत्र विद्यालय, उत्तन, भाईंदर(पश्चिम)जि. ठाणे