
मुंबई : कॅलिफोर्निया येथील सॅन डिएगो कॉमिक-कॉन इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये चित्रपटाची पहिली झलक समोर आणण्याचा बहुमान ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाला मिळणार आहे. नाग अश्विन दिग्दर्शित प्रोजक्ट के या चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हसन अशा अनेक मातब्बर कलाकारांची फौज झळकणार आहे. २० जुलै ते २३ जुलै दरम्यान पार पडणाऱ्या या कार्यक्रमात वैजयंती मूव्हीज १९ जुलै रोजी ओपनिंग नाईट पार्टीमध्ये प्रोजेक्ट के या चित्रपटाची पहिली झलक दाखवणार आहे. 'प्रोजेक्ट के' हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे.
तसेच, ‘प्रोजेक्ट के’चे निर्माते सॅन डिएगो येथे चित्रपटाचे शीर्षक, ट्रेलर आणि रिलीजची तारीख जाहीर करतील. चित्रपट निर्माते नाग अश्विन यांनी या खास प्रसंगी आपला आनंद व्यक्त करत 'भारत हे काही महान दिग्गजांचे आणि सुपरहिरोचे जन्मस्थान आहे. आणि कॉमिक-कॉन आम्हाला आमची कथा जागतिक प्रेक्षकांसोबत शेअर करण्यासाठी आदर्श व्यासपीठ बहाल करत आहेत.'निर्माते आसवानी दत्त यांनी आपल्या आनंदाची कबुली देऊन सांगितले की, 'आम्हाला या अद्भूत प्रवासाला सुरुवात करताना खरोखरच अभिमान वाटतो. आम्ही आमच्या देशातील काही आघाडीच्या कलाकारांसोबत सहयोग करून भारतीय सिनेसृष्टीच्या मर्यादा ओलांडत आहोत. सर्व भारतीय प्रेक्षकांसाठी भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, हा अभिमानाचा क्षण आहे.'