पुणे : “मदनदासजी देवी यांच्या व्यक्तित्वाचे वर्णन करायचे झाले, तर ’निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू’ असेच करावे लागेल. ते खर्या अर्थाने योगी होते, संघटन सूत्रामधून त्यांनी मनुष्याला जोडण्याचे काम केले. आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारांनी आणि आंतरिक स्नेहाने प्रेरित करून कोणत्या ना कोणत्या कामात सक्रिय केले. व्यक्तीच्या मनाला ते स्पर्श करीत असत. कार्यकर्त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे ते पालक होते. संघटनेचे आणि मनुष्य जोडण्याचे काम करीत असताना खूप काही सहन करावे लागते. हे सोपे कारण नाही. आंतरिक ज्वलन सहन करीत असतानादेखील त्यांनी स्वतः स्थितप्रज्ञाप्रमाणे आयुष्य व्यतीत केले. जातानादेखील ते आनंददायी आणि आनंदी होते. त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणून काम वाढविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल,” असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
ज्येष्ठ प्रचारक आणि संघाचे माजी सहसरकार्यवाह मदनदासजी देवी यांचे काल पहाटे बंगळुरु येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव आज सकाळी पुण्यात आणण्यात आले. रा. स्व. संघाच्या मोतीबाग येथील कार्यालयात ते अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे मदनदासजी यांचे पुतणे राधेश्याम देवी यांनी अंतिम संस्कार केले. याप्रसंगी झालेल्या श्रद्धांजली सभेमध्ये डॉ. भागवत बोलत होते. यावेळी सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अश्विनकुमार चौबे, डॉ. राजेंद्र प्रधान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्यप्रताप साही, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सरसंघचालक म्हणाले, “जन्म-मृत्यू हा सृष्टीचा नियम आहे. ज्ञानी व्यक्तीसुद्धा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने दुःखी होत असते. आम्हालाही याचे अतीव दुःख आहे. लाखो लोकांना आपुलकीने बांधलेल्या व्यक्तीच्या जाण्याचे दुःख सर्वव्यापी असते. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रातील मोठ्या जनसमुदायालादेखील त्यांच्या जाण्याचे दुःख झालेले आहे. त्यांनी केवळ संघटनेचे काम केले, असे नाही तर मनुष्याला जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. ते कार्यकर्त्यांना आपले मानायचे, त्यांना सांभाळायचे. मी जेव्हा त्यांच्या संपर्कात आलो तेव्हादेखील हा अनुभव मी केला. बालवयातील शाखेच्या मित्रांपासून ते विविध संघटनांच्या प्रमुखांपर्यंतचा कार्यकर्त्यांशी त्यांचा निकटचा संपर्क होता. ते सर्वांची काळजी करायचे. त्यांची संपूर्ण माहिती त्यांना असायची.”
पुढे ते म्हणाले की, “प्रत्येकाच्या मनुष्यत्वाची काळजी त्यांनी घेतली. त्यांचा स्नेहस्पर्श झाला ही मी धान्यता मानतो. मदनदासजी संघटनेचे आणि विचारांचे पक्के होते. कार्यकर्त्यांनी केलेल्या चुका ते स्नेहपूर्वक दुरूस्त करायचे. कोणत्याही गोष्टीचे मूल्यांकन करताना व्यक्तित्वाचे अवमूल्यन होणार नाही याची ते दक्षता घेत. त्यांचे अनेक ऋण आपल्यावर आहेत. यशवंतराव केळकर यांचा आदर्श घेऊन त्यांनी काम वाढविले. मनुष्याला मोह बिघडवतो. या सर्वांच्या पलीकडे जाऊन ध्येयाप्रती समर्पित कार्यकर्ते त्यांनी तयार केले. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. हे काम न थांबवता आणखी वाढत जाईल, असे समर्पित लोक त्यांनी तयार केले. आजारपणामुळे ते मागील काही वर्ष सक्रिय कामात नसले तरीदेखील त्यांच्यामध्ये एकटेपणा आलेला नव्हता. ते अतिशय स्थितप्रज्ञ होते. अंतिम क्षणीदेखील ते हसतमुख होते. ध्येयाप्रती असलेल्या क्रियाशील समर्पणातून आलेली ही प्रसन्नता होती. आपण चांगले व्हावे इतरांना चांगले करावे हा मंत्र त्यांनी शिकवला,” असे डॉ. भागवत म्हणाले.
कार्यकर्त्यांना दृष्टी, दिशा, संस्कार उद्देश देणारे व्यक्तिमत्व : जे. पी. नड्डा
कार्यकर्त्यांना दृष्टी-दिशा-संस्कार आणि उद्देश देणारे तप:पूत जीवन व्यतीत करणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते. इतरांसाठी सहज सरल स्वभावाचे मदनदासी स्वतःसाठी मात्र कठोर तपस्वी होते. अगदी किशोर वयातील तरुणांनादेखील ते आपला मित्र मानायचे. विद्वत्तेच्या बाबतीत त्यांचा कोणी हात धरू शकत नव्हते. व्यवस्था सुविधा नसतानादेखील त्यांनी प्रचंड काम उभे केल्याचे,” प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केले.
नड्डा यावेळी म्हणाले, “अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी संघटनेचे काम केले. अनेकदा तिकिटालादेखील पैसे नसायचे. सर्वत्र साधनसुविधेचा अभाव होता. परंतु, त्या वातावरणातही त्यांनी निष्ठेने विचार पुढे नेला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. लाखो कार्यकर्त्यांना त्या अधिष्ठानामध्ये समाविष्ट करून घेतले. संघटन शास्त्राच्या खोलीला जाणण्याचे कसब त्यांच्याकडे होते. प्रवास, वार्तालाप आणि बैठकीची कला, त्यातील बारकावे, तत्वे याच्या खोलीमध्ये ते जायचे. ते अत्यंत कुशल संघटक होते.” असे सांगुन नड्डा पुढे म्हणाले, “विपरित परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांना संस्कारित करणारे जीवन ते जगले. आजारपणातही त्यांचा अनेकांशी संपर्क टिकून होता. अनेकांची आस्थेवाईकपणे चौकशी करायचे. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावर चालत राहणे आणि संघटन वाढविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल,” असे नड्डा म्हणाले.
संघटनेप्रति वैचारिक प्रतिबद्धता आणि तत्वज्ञान निर्माण : मिलिंद मराठे
“मदनदासजी देवी यांनी अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री म्हणून २२ वर्षांत संघटनेला विशाल वटवृक्षात रुपांतरित केले. संघटनेप्रति वैचारिक प्रतिबद्धता व तत्वज्ञान निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यकर्त्यांना वैचारिक अधिष्ठान देण्यासोबतच जो जो मनुष्य त्यांना भेटला त्याच्या प्रति आत्मियतेचा भाव त्यांनी निर्माण केला. केवळ तात्विक समस्यांचे चिंतन त्यांनी केले नाही, तर दीर्घकालीन समस्यांवर चिंतन करून त्यांनी पाऊले उचलली. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रेमळ भाव, आत्मियता यामुळे हजारो कार्यकर्ते प्रेरित होऊन देशभरात काम करू लागली. सामाजिक कार्याची ज्योती प्रकट करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या प्रेरणेवर पुढील काळात संघटनेतील कार्यकर्ते काम करत राहतील हीच त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली,” या शब्दात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी अध्यक्ष, मिलिंद मराठे यांनी श्रद्धांजली वाहिली.
माजी खासदार प्रकाश जावडेकर, विनय सहस्रबुद्धे, अशोक मोडक, संघटनमंत्री संजय जोशी, रा. स्व. संघाचे कार्यकारिणी सदस्य अनिरुद्ध देशपांडे, मधुभाई कुलकर्णी, भारतीय मजदूर संघ केंद्रीय संघटनमंत्री सुरेंद्रन, केशव उपाध्ये, डिक्कीचे मिलिंद कांबळे, डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, हर्षवर्धन पाटील, श्याम जाजू, मुरलीधरन, राजेश पांडे, मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, हेमंत रासने, गणेश बीडकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु गोसावी, उदयन पाठक, गीताताई गुंडे, प्रसेनजित फडणवीस, बाळासाहेब फडणवीस, निलेश खेडकर, सचिन मेंगळे, अनिल फौजदार, हेमंत साठे, अरविंद रानडे, अर्जुन चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, सजी नारायण, श्रीपाद कुटासकर, प्रकाश गोरे, श्रीकांत कुलकर्णी, श्रीनिवास कंदुल, राजाभाऊ कदम, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक आदी मान्यवर उपस्थित होते.