मुंबई : एखादा दिग्दर्शक त्याच्या यशस्वी चित्रपटामुळे लाईमलाईटमध्ये आला की उगाचच त्यांच्या राजकारणातल्या पदार्पणाच्या चर्चा रंगू लागतात. अशीच चर्चा आता दिग्दर्शक केदार शिंदेंच्या बाबतीत रंगू लागली आहे. केदार शिंदे राजकारणात प्रवेश करणार का आणि केला तर कोणत्या पक्षात करणार आणि कोणाला पाठींबा देणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे स्वत: केदार शिंदे यांनी दिली आहे.
केदार शिंदे राजकारणात येणार
केदार शिंदे यांनी एका मराठी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते राजकारणात येणार आणि कोणत्या पक्षाला आणि नेत्याला पाठींबा देणार याचा खुलासा केला आहे. केदार शिंदेंनी दिलेल्या मुलाखतीनुसार, केदार शिंदेंना राजकारणात यायचं आहे. सध्याच्या राजकारणावर भाष्य करण्याची त्यांची इच्छा नाही. पण केदार यांना मैदानात येऊन लढायचं आहे. त्यांना ही योग्य वेळ वाटते. केदार शिंदे म्हणाले की, जेव्हा मी स्वतः राजकारणात उतरेन तेव्हा मला काही बोलण्याचा अधिकार असेल. मनोरंजन विश्वातुन आर्थिक स्थैर्य मिळालं की, राजकारणात जाण्याचा विचार करतील.
केदार शिंदेंच्या पडत्या काळात राज ठाकरेंनी त्यांना साथ दिली याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे भविष्यात राजकारणात आल्यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंना सपोर्ट करण्याची केदार यांना इच्छा आहे. याशिवाय केवळ उदरनिर्वाहासाठी राजकारण न करता मनोरंजन क्षेत्राच्या विकासासाठी काहीतरी करण्याचा केदार शिंदेंचा विचार आहे.