मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पुण्यात दाखल!
25-Jul-2023
Total Views | 81
मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास जी देवी यांचं काल बंगळुरूत निधन झाले. मदनदास जी देवी यांच्यवर आज दि. २५ जुलै रोजी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मदनदास जी देवी यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात आहेत. त्यांच्यासोबत भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान देखील देवी यांचं अंत्यदर्शन घेतील.
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, त्यांचं अंतिम दर्शन घेण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले आहेत. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबाळे देखील देवी यांचं अंत्यदर्शन घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मदनदास देवी यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी समर्पित केले. माझे त्यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. या दुःखाच्या वेळी सर्व कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ईश्वर शक्ती देवो.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मदनदास देवी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. देशसेवेसाठी आणि संघकार्यासाठी नि:स्वार्थीपणे आयुष्य समर्पित करणाऱ्या मदनदास यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी हानी आहे. कोट्यवधी कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणास्त्रोत होते. ईश्वर त्यांना आपल्या चरणी स्थान देवो.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मदनदास देवी यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्र आणि समाजसेवेसाठी व्यतीत केले. त्यांचे जीवन प्रत्येकाला निस्वार्थपणे समाजसेवा करण्याची प्रेरणा देते. त्यांच्या जाण्याने समाजाची कधीही भरून न येणारी हानी आहे. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.