नवी दिल्ली : करोना काळात लोकप्रिय झालेल्या अनेक ओटीटी माध्यमांपैकी नेटफ्लिक्स हे माध्यम अधिक पसंतीचे ठरले. या माध्यमाने भारतात सर्वाधिक लोकप्रियता मिळवली. दर्जेदार आशयांच्या वेब मालिका आणि चित्रपटांमुळे प्रेक्षकांनी नेटफ्लिक्सला अधिक पसंती दिली. परंतु नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन महाग असल्यामुळे कित्येक जण पासवर्ड शेअर करुन एकच अकाउंट अनेक जणांमध्ये वापरतात. मात्र आता यावर बंधन येणार आहे. तसे, आदेश जारी करण्यात आले आहेत. भारतातील नेटफ्लिक्स यूजर्स आता आपल्या अकाउंटचा पासवर्ड एकमेकांसोबत शेअर करू शकणार नाहीत. देशातील नेटफ्लिक्स यूजर्सना यासंदर्भात ईमेल येण्यास सुरुवात झाली आहे. एकच अकाउंट एकापेक्षा अधिक डिव्हाईसेसवर वापरणाऱ्या यूजर्सना अशा प्रकारचा ईमेल पाठवण्यात येत आहे.
नेटफ्लिक्सने आपली आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. जगभरातील कोट्यवधी नेटफ्लिक्स यूजर्स आपला पासवर्ड इतरांसोबत शेअर करत असल्यामुळे कंपनीचे मोठे नुकसान होते. तसेच, यामुळे नवीन टीव्ही सीरीज किंवा फिल्म बनवण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, नेटफ्लिक्सकडून येणाऱ्या ईमेलमध्ये, यूजर्स आता आपलं अकाउंट केवळ कुटुंबीयांसोबत शेअर करू शकतील. कुटुंबीयांव्यतिरिक्त दुसरी व्यक्ती जर सारखंच अकाउंट वापरत असेल, तर त्याची प्रोफाईल रिमूव्ह केली जाईल असे सांगण्यात आले आहे. यासाठी कंपनी आता यूजर्स कोणकोणत्या डिव्हाईसेसवर लॉग-इन आहेत हे तपासत आहे. "तुमचं नेटफ्लिक्स अकाउंट हे तुमच्यासाठी आणि तुमच्या घरातील व्यक्तींसाठी आहे" असं म्हणत नेटफ्लिक्सने यूजर्सना मेल केला आहे.
एक अकाउंट एकाच कुटुंबातील व्यक्ती वापरत आहेत हे तपासण्यासाठी नेटफ्लिक्स विविध गोष्टींचा वापर करत आहे. यासाठी कंपनी व्हेरिफिकेशन कोड, प्रायमरी लोकेशनवरील वायफाय अॅक्सेस असे फीचर्स लाँच करू शकते. तज्ज्ञांकडून याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे.
१०० देशांमध्ये ही पॉलिसी लागू
नेटफ्लिक्सची ही नो पासवर्ड शेअरिंग पॉलिसी अमेरिकेत यापूर्वीच लागू करण्यात आली होती. अमेरिकेमध्ये लागू केल्यानंतर काही तासांमध्येच जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये ही पॉलिसी लागू करण्यात आली असून यात भारतासह इंडोनेशिया, क्रोएशिया, केनिया आणि इतर देशांमध्ये ही पॉलिसी लागू करण्यात आली.
स्टँडर्ड मासिक प्लानची किंमत ४९९ रुपये आहे, तर प्रीमियम प्लानची किंमत ६४९ रुपये/महिना आहे. प्रीमियम प्लानमध्ये यूजर्सना फोर के रिझॉल्यूशन पर्यंत एकाच वेळी चार डिव्हाईसेसवर नेटफ्लिक्स स्ट्रीम करण्याची सुविधा मिळते. नेटफ्लिक्स केवळ मासिक प्लान्स देतं. वार्षिक सबस्क्रिप्शन उपलब्ध नाही.