बाळासाहेबांचं नाव असलेल्या महामार्गाला ‘शापित’ म्हणताना राऊतांनी ‘जनाची नाही तर...’
- केशव उपाध्येंची टीका
01-Jul-2023
Total Views | 240
मुंबई : वंदनीय बाळासाहेबांचं नाव असलेल्या महामार्गाला ‘शापित’ म्हणताना ‘जनाची नाही तर किमान मनाची’ ठेवायची होती. असं भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. नेहमीप्रमाणे संजय राऊत यांनी 'उचलली जीभ लावली टाळ्याला' हा कार्यक्रम राबवला आहे. असा खोचक टोला ही त्यांनी यावेळी लगावला आहे.
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या झालेल्या अपघातानंतर समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग आहे. या रस्त्यात अनेकांचे अश्रू आणि शाप आहेत. त्यामुळे हे अपघात होत असल्याचं मला वाटतं, असं धक्कादायक विधान संजय राऊत यांनी केलं आहे. राऊतांच्या या विधानाला नितेश राणेंनंतर आता केशव उपाध्येंनी पलटवार केला आहे.
केशव उपाध्ये म्हणाले, "समृद्धी महामार्गावर झालेला अपघात ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. हा केवळ अपघात आहे, याचं कारण अजून समोर यायचं आहे. त्यामुळे वास्तविक, ही वेळ आरोप प्रत्यारोपाची नाही. पण, संजय राऊत यांना सत्ताधाऱ्यांची कावीळ झाली असल्याने प्रत्येक गोष्ट पिवळी दिसत आहे. महामार्ग हे विकासाचे महत्वाचे साधन असते. यावर होणारे अपघात हे टळलेच पाहिजेत, या मताचे आम्हीही आहोत. पण अपघातावरून राजकारण करणाऱ्या राऊतांचा प्रयत्न म्हणजे मृतांच्या टाळुवरील लोणी खाण्यासारखाच आहे." असा घणाघात केशव उपाध्ये यांनी यावेळी केला आहे.