मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री 1.26 च्या सुमारास बस पलटून भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त बस ही नागपूर वरुन पुण्याला जात होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बस भरधाव वेगात असतांना तिचे टायर फुटले आणि बस काँक्रीट दुभाजकावर जाऊन आदळली. यामुळे बस जागीच पलटी झाली आणि तिने पेट घेतला. यामुळे बसमधील ३२ प्रवाशांपैकी २५ जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच, स्थानिक लोकांच्या मदतीने पोलीस प्रशासनाने जखमींना रग्णालयात दाखल केले. हा अपघात झाल्यानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेवर शोक व्यक्त करतांना मृत्यांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. सोबतच पंतप्रधान मोदींनी देखील घटनेवर शोक व्यक्त करत, मृत्यांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर केली आहे.
दुसरीकडे उबाटा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या अपघाताला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जबाबदार ठरवलं आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी शापित आहे, असं बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या विधानावर सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकांनी त्यांना अपघाताचे राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे.