मुंबई : जयंतराव सहस्त्रबुद्धे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना अपेक्षित अशा आदर्श कार्यकर्त्यांच्या माळेतील एक सुंदर मोती. देशासाठी तसेच समाजासाठी स्वतःला समर्पित करणारे उत्तम स्वयंसेवक घडावे हे डॉ. हेडगेवारांचे स्वप्नं होते. जयंतराव हे त्या स्वयंसेवकांपैकीच एक!, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाळ यांनी जयंतरावांना श्रद्धांजली वाहताना केले. ’विज्ञान भारती’चे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक जयंतराव श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी दि. २ जून रोजी वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना आदरांजली म्हणून सोमवारी राजा शिवाजी विद्यालय, दादर (पू) येथे ’श्रद्धांजली सभा’ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कृष्णजी गोपाळ बोलत होते.
जयंतरावांच्या सहवासातील आठवणी मांडताना ते म्हणाले, “जयंतरावांशी ३० वर्षांपूर्वीपासूनचे मैत्रीचे अगदी घनिष्ठ संबंध. विज्ञान भारतीचे कार्य करत असताना ते संघटन मंत्री होते. संघाच्या शाखेत निरनिराळ्या विचारांनी आलेले स्वयंसेवक नव्याने घडत असतात. असे अनेक विचार सामावून घेऊन त्यावर मंथन करणारा कार्यकर्ता म्हणजे जयंतराव. प्रचारक म्हणून वावरताना समाजात विलक्षण क्रांती घडेल असे त्यांचे समाजकार्य.”
प्रत्येक स्वयंसेवकाने टीपावे अशा जयंतरावांमधील गुणांना अधोरेखित करत पुढे ते म्हणाले, “जयंतराव हे प्रचंड विलक्षण बौद्धिक क्षमता असलेले एक व्यक्तिमत्त्वं. संगीत, कृषी, योग, अध्यात्मं आदी अनेक विषयांच्या बौद्धिकात त्यांचे नैपुण्यं. अभ्यासक्रमातील कोणताही विषय असो, प्रत्येकाचं सखोल ज्ञान. जयंतरावांच्या उत्तम प्रचारक असल्याचे उदाहरण म्हणजे त्यांचा कुठल्याही स्वयंसेवकाच्या घरच्यांशी असलेला संपर्क, त्यांच्याविषयी असणारी जाण. त्यांनी उच्च-नीच असा भेदभाव कधी केला नाही.
जयंतरावांचा राष्ट्रनिर्माणाच्या दृष्टीने विचार करण्याची मोठी दूरदष्टी होती. त्याचाही कृष्णजी गोपाळ यांनी विशेष उल्लेख केला. ते म्हणाले, “जयंतरावांना राष्ट्रनिर्माणासाठी बरंच काही करायचे होते. त्यांच्या डोक्यात बर्याच गोष्टी सुरु होत्या. मात्र ते आपल्यातून लवकर निघून गेल्याने मोठी पोकळी आज जाणवत आहे. समाजातील छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला घडवण्याचे कार्य जयंतरावांनी केले,” यावेळी आपल्या वयापेक्षा लहान व्यक्तीला श्रद्धांजली वाहणे किती कठीण असते हे कृष्ण गोपाळ यांच्या शेवटी पाणावलेल्या डोळ्यांनी दाखवून दिले.
जयंतराव सहस्त्रबुद्धे यांचे वडील श्रीकांत सहस्त्रबुद्धे आणि कोकण प्रांत संघचालक डॉ. सतिष मोढ यांनी सुरुवातीला जयंतरावांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहिली. श्रद्धांजली सभेला राज्याचे महिला व बालविकास आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, समतोल फाऊंडेशनचे विजय जाधव यांसह विज्ञान भारतीचे कार्यकर्ते, जनकल्याण समितीचे कार्यकर्ते, रा.स्व.संघाचे स्वयंसेवक, प्रचारक, नागरिक, आदी मंडळी उपस्थित होते. दरम्यान दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ’जयंत स्मृती’ या विशेष पुरवणीचे वितरणही यावेळी करण्यात आले.
मान्यवरांनी वाहिली आदरांजली
विज्ञानाला धरून समाजकार्य करण्याचा विचार...
’बीएआरसी’मधून निवृत्त झाल्यानंतर जयंतरावांशी संपर्क आला. विज्ञानाला धरून समाजकार्य कसे करता येईल हा विचार त्यांनी सांगितला. त्यांचे संशोधन आणि संघटन कौशल्य प्रचंड मोठं. कामात एकदम कटाक्ष. त्यांच्यासारखं आगळंवेगळं व्यक्तिमत्वं आपल्यातून जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे.
- डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ
एका कर्मयोगीचे उत्तम वेळेचे नियोजन!
जयंतरावांचे वेळेचे नियोजन एकदम उत्तम. त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा वापर संघकार्यासाठी केला. समाजातील जनसंपर्क अतिशय दांडगा. या वेळेच्या नियोजनातून जणू त्यांनी राष्ट्रनिर्माणात समर्पित होणार्यांना घडवण्याचा ध्यास घेतला होता, असे हे कर्मयोगी जयंतराव मातृभूमीचे कार्य कुठल्या न कुठल्या रुपात नक्कीच करतील.
- प्रफुल्ल सहस्रबुद्धे, जयंतरावांचे बंधू
मरावे परि किर्तीरुपी उरावे...
’मरावे परि किर्तीरुपी उरावे’ या वाक्याचा खरा अर्थ आज कळतोय. सहस्रबुद्धे कुटुंबीयांची सद्यःस्थिती एका डोळ्यात आसू आणि दुसर्या डोळात हसू अशी असली तरी जयंतरावांनी आज लोकप्रियता या शब्दाचा खरा अर्थ आज दाखवून दिला. जयंता, जयंतदादा, जयंतराव हा त्यांचा आयुष्यातील एक विलक्षण प्रवास होता. त्यांचे कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे.
- प्रज्ञा सहस्रबुद्धे, जयंतरावांच्या वहिनी
विज्ञान भारतीच्या एकूण क्षेत्रात मोठे योगदान
जयंतरावांचे विज्ञान भारतीच्या एकूण क्षेत्रात मोठे योगदान होते. ‘हेरिटेज सिटी’ या विषयावर त्यांचे कार्य अत्यंत अफाट. त्यांची विचारशैली प्रचंड अद्भुत. त्यांच्या अपघाताची घटना मनाला चटका लावणारी होतीच. मात्र त्यांचे आपल्यातून निघून जाणे हे मनाला समजवणे कठीण आहे.
- डॉ. सतीश मोढ, कोकण प्रांत संघचालक
एका भूमिकेतून दुसर्या भूमिकेत सहज शिरणारं व्यक्तिमत्वं
चिपळूणच्या प्रवासात जयंतरावांचे एका भूमिकेतून दुसर्या भूमिकेत सहज शिरण्याचं कौशल्य दिसून आले. संघकामासाठी निघालेल्या एका व्यक्तीच्या वेळापत्रकात लग्न समारंभाचा उल्लेख आणि त्यांनी तिथे दिलेली वेळ यातून सहज दिसून येते.
- माधव राजवाडे, कोकण प्रांत सचिव, विज्ञान भारती
’विज्ञान भारती’चे राष्ट्रीय संघटन सचिव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक जयंतराव श्रीकांत सहस्रबुद्धे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने प्रकाशित केलेल्या ’जयंत स्मृती’ या विशेष पुरवणीचे वितरण यावेळी करण्यात आले.