नाशिकमधून हैद्राबादकडे जाणार्या उंटांचा ताफा नुकताच नाशिकमधील तपोवनात पकडण्यात आला. प्रवासात अन्न पाणी न मिळाल्याने यातील दोन उंटांचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेला २४ तास होत नाही तोच मखमलाबाद शिवारात गेल्या शुक्रवारी पुन्हा २९ उंटांता ताफा आढळून आला. इतक्या मोठ्या प्रमाणात उंटांची वाहतूक का केली जात आहे याबद्दल अजून तरी सरकारी पातळीवरून काहीही विधान करण्यात आले नसले तरी हे उंट कत्तल करण्यासाठी नेले जात होते, अशी माहिती प्राणिप्रेमी आणि ‘अॅनिमल वेल्फअर’चे पुरुषोत्तम आव्हाड देतात. नाशिक येथे तपोवनात उंट पकडण्यात आल्यानंतर त्याची माहिती पोलीस स्टेशनला दिल्यानंतरही उंट अस्वच्छता करतील, असे कारण देत पोलिसांनी उंटांना तपोवनातून बाहेर काढून दिले. सलग दोन दिवस इतक्या मोठ्या संख्येने उंट शहरात नेले जातात आणि त्याबद्दल पोलीस यंत्रणा बेदखल असते हे अत्यंत वाईटच आहे.उंटांच्या वाहतुकीबद्दल हिंदू सकल समाजाचे गजू घोडके सांगतात की, ”हा उंटांच्या वाहतुकीचा सरळ साधा व्यवहार असूच शकत नाही, तर ही तस्करीच आहे.‘अॅनिमल वेल्फेअर’चे पुुरुषोत्तम आव्हाड सांगतात की, ’या उंट तस्करीमध्ये मोठे व्यापारी गुंतले असावेत. त्यांना हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेले जात होते. या रॅकेटमागे मोठे व्यापारी असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. इतकेच नव्हे, तर उंटांना धुळे, नंदूरबार साक्री, सटाणा या मार्गे विनासायस आणत असताना कुठल्याही पोलिसांनी त्यांना का हटकले नाही, असा संशय निर्माण होतो. त्यामुळे ही ‘वाहतूक करणार्यांनी उंट हैदराबाद येथे सोडण्यासाठी पैसे दिल्याचे उघड आहे,’ असेही प्राणिप्रेमी आव्हाड सांगतात.उंटांची संख्या अधिक असल्याने त्यांना नाशिक येथील अंबडजवळील पांजरपोळ येथे ठेवण्यात आले आहे. त्याच्या तात्पुरत्या जबाबदारीसाठी ‘पांजरपोळ’ संस्थेने दाखवलेली भूतदया, तत्परताही कौतुकास्पदच...! उंटाची अशा प्रकारे निर्दयीपणे वाहतूक करून दोन उंटांच्या मृत्यूस जबाबदार असणार्या उंटांच्या मालकाला पकडण्यात आले आहे. दोन दिवस संभ्रमाच्या वादळात सापडलेल्या उंट प्रकरणाचा आता उलगडा होणार आहे. मात्र,इतक्या मोठ्या संख्येने प्राण्याची वाहतूक होत असेल पोलिसांहसह नागरिकांनीही दक्ष राहायलाच हवे.
गोदावरी नदी स्वच्छतेसंदर्भात शासन, प्रशासन, गोदापे्रमी, स्वयंसेवी संस्था यासह अनेकांचे मोठे प्रयत्न सुरू असतात. सुरक्षा रक्षक मंडळांकडून गोदावरीचे प्रदूषण होऊ नये म्हणून पहारा देणार्या सुरक्षारक्षकांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतन अदा करण्यात आले नाही. परिणामी, गोदाघाट ‘धोबीघाट’ आणि वाहन धुण्याचे ’वॉशिंग सेंटर’ झाल्याचे चित्र आहे. गोदावरी नदी तटावर नुकतीच स्वच्छता मोहीम रावबत महापालिकेने ४०० किलो कचरा, प्लास्टिक संकलन केले. नदी स्वच्छ राहावी म्हणून महापालिका, सेवाभावी संस्था आणि गोदाप्रेमी, पर्यावरण प्रेमी प्रबोधनासह काम करत असताना सुरक्षा रक्षकांना वेळेवर वेतन अदा केले जाऊ शकत नाही ही बाब गंभीरच.! गोदावरीत कपडे आणि वाहने धुण्यास सक्त मनाई असताना दुतोंड्या मारुतीच्या सांडव्यापासून दक्षिणेकडील घाटांवर महिला सर्रास कपडे धुताना दिसतात. यासह अनेक दुचाकी, चारचाकी वाहनेही येथेच धुतली जात असल्याचे चित्र आहे. गोदावरीचे अशा प्रकारे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर काही दिवस गोदावरीत कचरा, निर्माल्य टाकणारे आणि वाहने, कपडे धुणार्यांवर दंडात्मक कारवाईदेखील झाली. मात्र, आता गेल्या पाच महिन्यांपासून सुरक्षा रक्षकांचे वेतन न दिल्याने ते गोदाकाठावर फिरकतही नाहीत. परिणामी, गोदाघाटावर प्रचंड अस्वच्छता दिसत आहे. निर्माल्य टाकण्यासाठी तयार केलेले निर्माल्य कलशही सध्या गायब झाले आहेत. त्यामुळे प्रथम सुरक्षा रक्षकांचे वेतन देऊन गोदाघाटांवर निर्माल्य कलशांची संख्याही वाढवणे गरजेचे आहे. गोदावरी नदी नाशिकची जीवनवाहिनी आहे. तिची स्वच्छता, प्रवाहीपणा टिकवणे प्रशासनासह नाशिककरांचेही आद्य कर्तव्यच.! गोदावरी स्वच्छतेसाठी अनेकवेळा प्रयत्नही यापूर्वी झाले, होतही आहेत. आता गोदाप्रदूषण रोखण्यासाठी कडक दंडात्मक कारवाईसह महिला अन् शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण, गोदातीरी महिला कपडे धुतात म्हणजे त्यांना त्याच्या घराजवळ पाणी उपलब्ध होत नाही. असाही अर्थ होतो. कुठलाही विकास महिलांच्या सहभागाशिवाय शक्य नाही आणि कुठलेही परिवर्तन नवीन पिढीशिवायही शक्य नाही त्यामुळे महिला अन् बालकांचे प्रबोधनही आवश्यक ठरते.