मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष पदावरून पायउतार झाले आहेत. पवारांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. त्यावर सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले, “शरद पवारांनी राजीनामा देऊन एका दगडात दोन पक्षी मारले आहेत, त्यांनी राजीनामानाट्यातून अजित पवारांना चपराक लगावत त्यांना उघडं पाडलं,” असे भाष्य रामदास कदम यांनी केले आहे.
“महाराष्ट्रातील आणि देशातील राष्ट्रवादीची जनता माझ्याबरोबर आहे. अजित पवार तुमच्याबरोबर नाहीये. हे त्यांनी अजित पवारांना दाखवून देत, एकाकी पाडलं आहे. मधल्या काळात अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होती. त्यासाठी काही आमदारांच्या भेटीगाठीही सुरू होत्या. त्यामुळे शरद पवारांनी राजीनामा देत अजित पवारांना दाखवून दिलं की, हा पक्ष माझा आहे, तुझा नाही. तुझ्याबरोबर कुणीही नाही,” असेही रामदास कदम म्हणाले.
राहुल गांधींचा सुप्रिया सुळेंना फोन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून गोंधळ सुरू असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करुन चर्चा केली. सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रवादीची धुरा जाण्याची शक्यता असल्याने राहुल गांधी यांनी सुप्रिया सुळे यांना थेट फोन करत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत आपले मत मांडले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा. पवारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा,” अशी विनंती राहुल गांधी यांनी या वेळी केली.