पुणे : अभ्यासासाठी प्रियकराच्या खोलीवर गेलेल्या युवतीने किरकोळ वादामधून धारदार सुर्याने हल्ला करीत प्रियकराचा खून केला. ही घटना वाघोली येथील यशवंत रायसोनी महाविद्यालयाजवळ सोमवारी पहाटे घडली. विशेष म्हणजे यावेळी अन्य विद्यार्थी देखील खोलीमध्ये अभ्यास करीत बसलेले असताना ही घटना घडली. या घटनेत हल्लेखोर प्रेयसीनेदेखील स्वत:च्या हाताची शीर कापून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यशवंत अशोक मुंडे (वय २२, मूळ रा. लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनुजा महेश पन्हाळे (वय २१, रा. अहमदनगर) विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही रायसोनी महाविद्यालयामध्ये विदा विज्ञान (डेटा सायन्स) अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाला आहेत. यशवंत हा महाविद्यालयाजवळच राहण्यास होता. सध्या त्यांच्या परीक्षा सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून ते एकत्र अभ्यास करुन परीक्षेची तयारी करीत होते. रविवारी रात्री अनुजा अभ्यासासाठी त्याच्या खोलीवर गेलेली होती. त्यांच्यासोबत अन्य विद्यार्थी मित्रही तिथे अभ्यासाला आलेले होते.
यशवंत आणि अनुजा बेडरुममध्ये अभ्यास करीत होते. तर, उर्वरीत मुले अन्य खोल्यांमध्ये अभ्यास करीत होती. सोमवारी पहाटे किरकोळ कारणावरुन त्यांच्यामध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. तिने स्वयंपाकघरातील भाजी कापण्याच्या सुरीने पोटावर आणि छातीवर सपासप वार करायला सुरुवात केली. हल्ला केल्यानंतर ती बाहेर आली. एका बाकड्यावर बसून तिने स्वत:च्या हाताची शीर कापली. तिला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून घाबरलेल्या अन्य विद्यार्थ्यांनी यशवंतच्या खोलीकडे धाव घेतली. तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. विद्यार्थ्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करुन जखमी अनुजा आणि यशवंत यांना रुग्णालयात हलवले. दरम्यान, यशवंतचा मृत्यू झाला होता. यशवंत हा तिच्यावर संशय घेत होता. तिच्यावर अनेक बंधने लादण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.