मुंबई : राहुल गांधी यांचे वायनाड सदस्यत्व अपात्र ठरल्यानंतर त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस दिल्यानंतर विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले असताना, आज एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, "पंतप्रधान मोदींचा अपमान करताना राहुल गांधी ओबीसी समाजाचा अपमान करत आहेत. तुम्ही माझा अपमान करू शकता, पण देशाचा अपमान करू नका, असे पंतप्रधान नेहमीच सांगत असतात. शब्द स्वतःचे, संस्कार सोनिया गांधींचे." असे म्हणत त्यांनी टीका केली आहे.
स्मृती इराणी म्हणाल्या की, "राजकीय रोषात राहुल गांधींनी मोदींबद्दल काढलेले विष देशाच्या अपमानात बदलले आहे. पंतप्रधान मोदींचा अपमान करताना त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान करणे योग्य मानले. नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर हल्ला करण्यासाठी त्यांनी परदेशात खोटे बोलले, देशात खोटे बोलले. संसदेत खोटे बोलले. हीच व्यक्ती सर्वोच्च न्यायालयासमोर नाक घासून माफी मागते आणि आज भ्याड नसल्याचा आव आणते."
"राहुलने मुलाखतीत म्हटले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदींची ताकद ही त्यांची प्रतिमा आहे आणि राहुल गांधींनी 4 मे 2019 रोजी एका मासिकाच्या मुलाखतीत शपथ घेतली होती की, जोपर्यंत ती प्रतिमा नष्ट होत नाही तोपर्यंत मी पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेवर हल्ला करत राहीन. नरेंद्र मोदींवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जेव्हा त्यांनी संसदेत हा टोमणा मारला, तेव्हा त्यांना त्यांचे म्हणणे सिद्ध करण्यास सांगण्यात आले. पण त्यांनी तसे केले नाही."