नवी दिल्ली : “दहशतवाद, बेकायदेशीर शस्त्रास्त्र व्यापार, अमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी आदींमुळे जगाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होत आहे. त्यास सामोरे जाण्यासाठी नवीन रणनीती आखण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
‘एरो इंडिया 2023’च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी बंगळुरू येथे आयोजित संरक्षणमंत्र्यांच्या संमेलनाचे यजमानपद भूषवले. त्यावेळी ते बोलत होते. 27 देशांचे संरक्षण आणि उप संरक्षणमंत्री या संमेलनात उपस्थित होते. ‘संरक्षणातील वर्धित प्रतिबद्धतांद्वारे सामायिक समृद्धी’ (स्पीड) अशी या संमेलनाची व्यापक संकल्पना होती.
“वाढत्या-जटिल जागतिक सुरक्षा परिस्थितीत अधिक सहकार्याची गरज संरक्षणमंत्र्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात अधोरेखित केली. ’स्पीड’ या कार्यक्रमाची संकल्पना सध्याच्या युगाचे निदर्शक आहे, यात भू-राजकीय आणि सुरक्षा वास्तविकता आतापर्यंत न अनुभवलेल्या वेगाने बदलत आहेत,” असे ते म्हणाले. अशा जलद बदलांना प्रतिसाद देण्यासाठी त्यांनी वास्तव काळातील (रिअल-टाइम) सहकार्याचे आवाहन केले. अर्थव्यवस्था, सुरक्षा, आरोग्य किंवा हवामान या क्षेत्रातील कोणताही मोठा बदल जागतिक स्तरावर होतो आणि जेव्हा कोणत्याही प्रदेशाची शांतता तसेच सुरक्षितता धोक्यात येते तेव्हा संपूर्ण जगाला अनेक मार्गांनी त्याचा प्रभाव जाणवतो असे मत राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.
संरक्षण मंत्र्यांनी विकास आणि समृद्धीसाठी सामूहिक सुरक्षितता अनिवार्य अट असल्याचे सांगितले. नव-वसाहतवादी पद्धतीनुसार अशा सुरक्षा विषयक समस्या हाताळण्यावर भारताचा विश्वास नसून आम्ही सर्व राष्ट्रांना समान भागीदार मानतो, असे त्यांनी यावेळी नमूद केले.