मुंबई : म्हाडाच्या माध्यमातून तसेच प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) यांसारख्या विविध शासकीय योजनांद्वारे राज्यातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे याकरिता महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. राज्य शासनाने राज्यात जास्तीत जास्त घरे निर्माण व्हावीत याकरिता गृहनिर्मिती संदर्भात वेळोवेळी नियमावलीमध्ये बदल केले आहेत व गृहनिर्मितीला वेग देणारी धोरण जाहीर केली आहेत. पुणे जिल्ह्यात म्हाडाला परवडणार्या दरात सर्वसामान्यांसाठी अधिकाधिक घरे उभारता यावी, यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले.
म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते संगणकीय सोडत काढण्यात आली. यावेळी सावे बोलत होते.
सावे म्हणाले की, पुणे मंडळाच्या ५८६३ सदनिकांसाठी ७७,२८० अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ५९,७८८ अर्जदारांचे अनामत रकमेसह अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हणजेच सुमारे १० पटीने अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे शहरात ही स्थिती असल्याचे दिसून येत असून यावरून राज्यातील घरांची कमतरता अधोरेखित होत आहे. यामुळे राज्य शासनाचे गृहनिर्मिती क्षेत्रामधील उत्तरदायित्व अधिक वाढले आहे . ते पुढे म्हणाले, की राज्यातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे याकरिता शासन कटिबद्ध आहे. राज्यात जास्तीत जास्त घरे निर्माण व्हावीत याकरिता गृहनिर्मिती संदर्भात वेळोवेळी नियमावलीमध्ये बदल केले आहेत व गृह निर्मितीला वेग देणारी धोरणे जाहीर केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील रे नगर येथे विडी कामगारांसाठी ३०००० सदनिका उभारणीचे काम प्रगतीपथावर असून काही घरांचे लोकार्पन लवकरच केले जाणार असल्याचे सावे यांनी सांगितले.
पुणे मंडळाच्या संगणकीय सोडतीत संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवड योजना क्रमांक ७६२ -ए या योजनेची सोडत जाहीर करण्यात आली व सर्व प्रथम विजेते विष्णुकांत राठी ठरले. या सोडत प्रसंगी सभागृहात उपस्थित विजेत्या अर्जदारांचा म्हाडातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी विजेत्या अर्जदारांनी मनोगत व्यक्त करताना म्हाडाच्या पारदर्शक संगणकीय सोडत प्रणालीचे कौतुक केले.
यावेळी व्यासपीठावर विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, मुख्य अभियंता शिवकुमार आडे, पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील आदी उपस्थित होते.
म्हाडाद्वारे वेबकास्टिंगच्या माध्यमातून घरबसल्या सोडतीचे थेट प्रक्षेपण बघण्याच्या सुविधेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. सोडतीचा निकाल https://mhada.gov.in व https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर अर्जदारांसाठी प्रदर्शित करण्यात आला आहे.